Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली!

राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली!

नाना पटोलेंनी दिला घरचा अहेर

मुंबई  : राज्यात राजकीय गुन्हेगारी वाढली आहे. वाळूमाफिया ग्रामीण भागातल्या पत्रकारांना ट्रकखाली चिरडून मारत आहेत. वकिलांचे खून होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. अशावेळी हे सारे थोपवण्यासाठी काय धोरण आखणार? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच सत्ताधारी पक्षाचे सदस्य नाना पटोले यांनी शुक्रवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

भाजपच्या सीमा हिरे यांनी नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल येगे यांच्या हत्येच्या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर झालेल्या चर्चेत पटोले यांनी ही भूमिका घेतल्याने सारे सभागृह अचंबित झाले. यावेळी दिलेल्या उत्तरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र पटोले यांच्या आरोपाला खोडून काढत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. त्यामुळेच हे राज्य प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते, असे सांगितले. मृत व्यक्तीने आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवणारे पत्र नाशिक पोलिसांना दिले होते. परंतु त्यांना संरक्षण देण्यात आले नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे आरोपींवर कारवाई करावी म्हणून आंदोलन करणाऱ्या भाजपच्या आमदारांवर तसेच इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच या खून प्रकरणाच्या षडयंत्रात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरूद्ध ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच भाजपच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरली. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्याची तत्परता दाखवणाऱ्या नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तशी तत्परता का दाखविली नाही?, असा सवाल विखे पाटील यांनी केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढण्याची भीती गणेश नाईक यांनी व्यक्त केली. चर्चेच्या उत्तरात सतेज पाटील यांनी या प्रकरणातल्या भाजपाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील तसेच मृत व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या पत्रावर का कारवाई केली गेली नाही?, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -