Friday, April 26, 2024
Homeक्रीडाजपानने रोखले भारताला

जपानने रोखले भारताला

ढाका (वृत्तसंस्था) :आशियाई चँपियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न भंगले. तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्धी जपानने खेळ उंचावताना गतविजेत्यांवर ५-३ असा विजय मिळवत आठ वर्षांनंतर फायनल प्रवेश केला. अंतिम फेरीत जपानसमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असेल.

गटवार साखळीत जपानचा ६-० असा धुव्वा उडवणाऱ्या भारताचे उपांत्य फेरीत पारडे जड होते. मात्र, दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानने कमाल केली. त्यांनी पाच गोल करताना मागील पराभवाचा सव्याज बदला घेतला. तसेच दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी, जपानने २०१३मध्ये फायनल प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना पाकिस्तानकडून मात खावी लागली होती.

पहिल्या सत्रात चार तर दुसऱ्या सत्रात तीन गोल झाले. जपानकडून क्रिशिडाने पहिल्या आणि २९व्या मिनिटाला दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला, फुजिशिमा (दुसऱ्या मिनिटाला) मोरॅटा (३५व्या मिनिटाला) आणि टॅनाकाची (४१व्या मिनिटाला) चांगली साथ लाभली. भारताकडून दिलप्रीत(१७व्या मिनिटाला), हरमनप्रीत (५३व्या मिनिटाला) आणि हार्दिकने (५९व्या मिनिटाला) गोल केला.
जपानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या सहा मिनिटांत सहा पेनल्टी कॉर्नरवर मिळवले.  तसेच त्यातील दोन कॉर्नरचे गोलांमध्ये रूपांतर करताना २-० अशी आघाडी घेतली. भारताने आक्रमक चाली रचण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्या क्वार्टरअखेर जपानने आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दुसऱ्याच मिनिटाला (१७वे मिनिट) भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत प्रतिस्पर्ध्यांची आघाडी कमी केली. दिलप्रीतने हा गोल केला. या गोलनंतर गतविजेत्यांचा आत्मविश्वास उंचावला.

या क्वार्टरमध्ये भारताने अधिकाधिक वेळ चेंडूचा ताबा राखला. परंतु, एक मिनिट आधी मैदानावरील अंपायर्सनी जपानला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्यात गोल करताना त्यांनी एकूण आघाडी ३-१ अशी वाढवली.तिसऱ्या क्रमांकासाठी भारत पाकिस्तानशी भिडणार उपांत्य फेरीतील भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी तिसऱ्या क्रमांकासाठी एकमेकांशी भिडतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -