Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीम्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

म्हाडा कॉलनीतील रहिवाशांना विद्युत तारांमुळे धोका

विद्युत खांब केव्हा स्थलांतरित करणार? स्थानिकांचा सवाल

विजय मांडे

कर्जत : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवास धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवास धोका पोहोचवतील, अशा अवस्थेत आहेत.

‘नको देवराया, अंत आता पाहू’ अशी स्थिती सध्या कर्जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशांची झाली आहे. कारण, सुमारे दोन वर्षांपूर्वी वीजवितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता रहिवाशांना अडथळा ठरेल अशाप्रकारे रात्रीच्या वेळेस रस्त्यांच्या मधोमध गटारापासून एक-दोन फुटांच्या अंतरावर विद्युत पोल उभे केले आहेत. याबाबत म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनी तसेच स्थानिक नगरसेविका स्वामिनी मांजरे यांनी मागील दोन वर्षांपासून वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रव्यवहार तसेच कित्येकदा फोनवर संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही कारवाई केलेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या कॉलनीतील रस्त्यावर धोकादायक लावलेल्या विद्युत पोलमुळे अनेक वाहनांचे तसेच नागरिकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात प्राणहानीदेखील होण्याची दाट शक्यता आहे; परंतु त्याचे गांभीर्य कित्येकदा तक्रारपत्रे देऊनही वीज कंपनीला नाही. तसेच म्हाडा येथील एका धोकादायक वृक्षाच्या फांद्या विद्युत वाहिनीवर पडून दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. याबाबतही महावितरण कार्यालयास कळवण्यात आले आहे. पण त्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या आजही आहे त्याच स्थितीत आहेत, असाही आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान संबंधित अभियंत्यांनी तातडीने म्हाडा कॉलनीतील धोकादायक विद्युत पोलचे स्थलांतर करून धोकादायक वृक्षाच्या फांद्या तोडल्या नाहीत आणि भविष्यात एखादी दुर्घटना घडली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सदर वीज कंपनीची असेल, असे माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -