थंडी सुरू झाली आई, थंडी सुरू झाली
थंडी सुरू होताच म्हणती, लाली आली गाली…
खरंच का गं आई, आता गाल होणार लाल
लाली लावलेला मी दिसेन कृष्ण गोपाल……

काही काही भागात असतो थंडीचा गं कहर
गरीब दीन दुबळे तेव्हा काय करतात हर! हर!
जेवायलाच धड नसते पांघरत असतील काय?
काय करेल गरीब बिचारी असते त्यांची माय…

या वर्षी मला तू स्वेटर नकोच घेऊ
त्याऐवजी आपण ना त्यांनाच घेऊन देऊ…
पांघरुणे ही देऊ चार ऊबदार त्यांना
सन्मानाने देऊ त्यांना म्हणू तुम्ही घ्या ना!…

अनाथाश्रमात जाऊ देऊन कपडेलत्ते त्यांना
वह्या-पुस्तके-रबरही घेऊन जाऊ या ना
खुलतील गं चेहरे त्यांचे, होईल त्यांना खुशी
काय गं दोष त्यांचा नियती अशी कशी?…

थोडे थोडे पैसे साठवून गरिबांसाठी
दर वर्षी देऊ त्यांना भेट छोटी-मोठी…
आनंदाने फुलतील चेहरे चार दिवस सुखाचे
वेध लागले बघ मला अनाथाश्रमाचे…

– सुमती पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here