Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीChandrashekhar Bawankule : भाजपच्या संघटनात्मक कार्यात सिंधुदुर्ग राहील अव्वल

Chandrashekhar Bawankule : भाजपच्या संघटनात्मक कार्यात सिंधुदुर्ग राहील अव्वल

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

कणकवली (वार्ताहर) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक गरीब कल्याणकारी योजना राबविल्या. (Chandrashekhar Bawankule) यापुढेही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यातही भाजपचे सरकार पूर्ण ताकदीने येण्यासाठी संकल्प केला आहे. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम झाला आहे.

जिल्ह्यातील ७० टक्के सत्ता केंद्रे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. मला खात्री आहे सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यावर संकल्प पूर्णत्वास जाणारच आणि सर्व जिल्ह्यात भाजपाच्या संघटनात्मक कार्यात सिंधुदुर्ग अव्वल राहील’, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भारत हा जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवताना आणि भारताला गतवैभव मिळवून देण्याचा, जगाला मानव संसाधने पुरवण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ ते २०३५ या काळासाठी महायज्ञ आयोजित केला आहे. या महायज्ञामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही दररोज दोन तास देऊन किमान ८ घरांमध्ये जावे. या तासांत केंद्राच्या योजनांचे दोन लाभार्थ्यांकडून ‘धन्यवाद मोदीजी’ हे पत्र,  १८ ते २५ वयोगटांतील युवा वॉरियर्सची निवड, नवमतदारांची नोंदणी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी यांची निवड करावी असेही आवाहन बावनकुळे यांनी केले.

यावेळी बावनकुळे म्हणाले, ‘राज्यात सर्वात मोठे यश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळेल. ३२५ ग्रामपंचायतीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायती भाजप जिंकेल. ‘महिला वांरीयर्स’ बनविण्याचे काम आम्ही करणार आहोत. वर्षभरात जिल्ह्यात सात लाखांहून अधिक लोकांपर्यंत वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून आम्ही पोहचू असे नियोजन केले आहे. आतापर्यंत राज्यातील ३२ जिल्ह्यात माझा दौरा पूर्ण झाला आहे. विकासात्मक आणि संघटनात्मक असा हा दौरा आहे. भाजपा मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सिंधुदुर्गात ५०० प्रवाशी कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. सर्वसामान्य तसेच गरिबांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ते काम करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांना संपर्क करून आम्ही भाजपशी जोडणार आहोत. ‘फ्रेंड ऑफ बीजेपी’ असे अभियान राबविण्यात येणार आहे. मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भाजपची सत्ता असलेले सरकार आणू , अशी शपथही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यापुढील काळात प्रचंड ताकदीने भाजप वाढेल. असेही ते म्हणाले.

MahaAwas Yojana : ठाणे जिल्हा परिषदेचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव

कलमठ महाजनी नगर येथील वृंदावन सभागृहात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. यात बावनकुळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. बावनकुळे म्हणाले, ‘भाजपने उद्दीष्ठ ठेवलेल्या ४०० लोकसभा मतदार संघात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदार संघावर भाजपचा  झेंडा फडकावा यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे. कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम केले तर आपला पराभव कुणीच करू शकत नाही. त्यामुळे वर्षभरात ठरवलेल्या सिंधुदुर्गातील ५०० पदाधिकाऱ्यांनी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात तुम्ही पोहोचाल. यातून लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतीपर्यंत भाजपचा विजय निश्चित असेल’.

ठाकरे सरकारच्या काळात कोकणचे नुकसान…  

राज्याने गेल्या अडीच वर्षात उध्दव ठाकरे यांच्या रूपाने सगळ्यात निष्क्रिय मुख्यमंत्री पाहिला. भाजपाशी बेईमानी करत त्यांनी सरकार बनवले आणि ते जनतेचा अपेक्षा भंग करणारे ठरले. ठाकरे सरकारच्या काळातच कोकणचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकार ते नुकसान निश्चित भरून काढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -