Friday, April 26, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअग्रलेख : समाजभान राखणारा द्रष्टा अभिनेता

अग्रलेख : समाजभान राखणारा द्रष्टा अभिनेता

एखाद्या क्षेत्रावर, अभिनय कलेवर अधिराज्य गाजवणे, अथवा आपल्या कलागुणांच्या बळावर त्या क्षेत्रात दबदबा निर्माण करणे, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे म्हणजे काय? याचे मोठे उदाहरण द्यायचे झाल्यास अभिनय सम्राट विक्रम गोखले यांचे नाव अग्रस्थानी असेल. आपल्या दमदार, कसदार अभिनयाने त्यांनी मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी मालिका अशा सर्वच माध्यमांवर आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यांनी मराठी रंगभूमीबरोबरच मराठी – हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे असे एक अढळ स्थान निर्माण केले होते. असा हा विक्रमादित्य ज्येष्ठ अभिनेता तुम्हा-आम्हा सर्वांच्या काळजाला चटका लावून काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात १७ दिवस उपचार घेत असताना हा ज्येष्ठ अभिनेता अचानक सर्वांना सोडून गेला. त्यांच्या रूपाने रंगभूमी, बॉलिवूडने एक प्रतिष्ठित अभिनेता गमावला आहे.

आपल्या चतुरस्र अभिनयाची मोहोर मराठी रंगभूमीसह मराठी व हिंदी चित्रपटांवर उमटविणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये रुळले होते. मराठी रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला होता. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांतील क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव होते. विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ मध्ये पुण्यात झाला. त्यांचे कुटुंब सिनेसृष्टीत सक्रिय होते. अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढ्यांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. गेली सात दशके त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली. ‘रंगमंचावर टाळ्या घेतल्या की अभिनय आला, असे कलाकारांना वाटते. लेखकाने लिहिलेल्या ओळी वाचल्या की टाळ्या मिळतात, अशी अभिनयाची एक ढोबळ व्याख्या केली जाते.

पण कलाकारांनी अभिनय चांगला होण्यासाठी स्वत:कडे त्रयस्थपणे पाहिले पाहिजे. अभिनयशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे रोखठोक मत गोखले यांचे होते. फक्त अभिनय न करता त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनही केले. गोखले यांनी दिग्दर्शिक केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते.अभिनय क्षेत्रात हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देऊन दातृत्वाचा मानदंड प्रस्थापित केला. क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी होते. विक्रम गोखले यांनी आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ते अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठच होते. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देऊन ती व्यक्तिरेखा जिवंत करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा चेहरा प्रचंड बोलका होता. त्यांचे डोळे न बोलताही खूप काही सांगून जायचे.

आता तर त्यांच्या तोडीला कुणीच दिसत नाही. असा अभिनेता आता होणे नाही. त्यांचे ‘बॅरिस्टर’मधील काम खूपच गाजले होते. त्यांचे ‘महासागर’ही असेच नावाजले गेले. हिंदी सिनेमा ‘अग्निपथ’ मध्ये ते होते. शहेनशहा अमिताभ बच्चन हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. विक्रमजींचा सहजसुंदर अभिनय पाहून अमिताभही भारावून गेले होते. पण मन लावून काम करायचे आणि जी भूमिका आपल्या पदरी अली आहे त्याचे सोने करायचे हेच त्यांचे ध्येय होते आणि म्हणूनच ते आज यशाच्या शिखरावर होते. विक्रम गोखले हे फक्त कलाकार नव्हते तर व्यापक सामाजिक भान असलेला द्रष्टा अभिनेता होते. भारदस्त व्यक्तमत्त्व, देहबोली आणि डोळ्यांतून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी आणि करारी बाणा हे सर्व गुण क्वचितच कुणाला लाभले असतील. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा दबदबा तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करणे किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. अशाप्रकारे ते सामाजिक दायित्वाचे आपले कर्तव्य इमानेइतबारे कोणताही गाजावाजा न करता पार पाडायचे. याबाबतचे बाळकडू त्यांना त्यांचे पिताश्री ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळाले. समाजभान राखणारा, रोखठोक बोलणारा, कडक शिस्तीचा अन् आपल्या भूमिकेवर ठाम असणारा असा अभिनेता पुन्हा होणे नाही, हे मात्र त्रिवार सत्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -