Saturday, May 11, 2024
Homeमहत्वाची बातमीओमायक्रॉन कधी संपणार?

ओमायक्रॉन कधी संपणार?

उदय निरगुडकर , ज्येष्ठ पत्रकार

एव्हाना अवघ्या जगाबरोबरच आपला देशही ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडला आहे. दुर्दैवाने या विषाणूच्या संसर्गाची तीव्रता वाढत आहे. ओमायक्रॉनच्या धोक्याविषयी आणि संभाव्य लाटेची पूर्वसूचना अलीकडेच समोर आली होती. ही लाट महाप्रचंड असेल, मागच्या दोन्ही कोरोना लाटांमधल्या बाधितांपेक्षा या लाटेतल्या बाधितांची संख्या जास्त असेल, असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलताना उमगलं होतं. आज दुर्दैवाने ते सत्यात उतरलं आहे. त्यातच पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका म्हणजे प्रचार आला. प्रचार म्हणजे शक्तिप्रदर्शनाच्या सभा आल्या. सुदैवाने या वेळी निवडणूक आयोगानं अशा प्रकारच्या मेगा इव्हेंट्सवर, प्रचार सभांवर तात्पुरती बंदी आणली आहे. नागरिकांनी देखील देवळांमधून गर्दी करू नये, सार्वजनिक स्थळी गर्दी वाढवू नये हे अधिक श्रेयस्कर. हे सर्व टाळण्यासाठीच अनेक राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्यांचं पालन होण्याच्या दृष्टीने मात्र फारशा कठोर उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे रात्री तुरळक का होईना, रस्त्यावर रहदारी असते. याचाच परिणाम म्हणून सध्या देशात दिवसाला दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्या वाढत आहे.

पश्चिम बंगाल सोडून गोवा विधानसभेत मुसंडी मारण्याची स्वप्नं पाहणाऱ्या ममता बॅनर्जींना स्वत:च्या राज्यातला ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्यात सपेशल अपयश आलं आहे. जी गत पश्चिम बंगालची तेच महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचं. सुशासनाचे ढोल पिटणाऱ्या केजरीवालांची दिल्ली ओमायक्रॉनच्या प्रसाराचा केंद्रबिंदू ठरली. हे नि:संशय जसं त्या त्या राज्यांचं अपयश आहे तसंच नागरिकांच्या मनोवृत्तीचंही लक्षण आहे. ईशान्येकडची छोटी राज्यं लसीकरणात आघाडीवर दिसतात. कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी झालेली दिसतात. इथेही राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल रोज उठून बोलणारी आणि प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला जबाबदार धरणारी राज्यं आणि त्यांचं प्रशासन यानिमित्ताने उघडं पडलं आहे. आता कोरोनाची घरी करावयाची टेस्ट कीट्स २००-२५० रुपयांत सर्रास उपलब्ध आहेत. त्यातून येणारे निकाल आणि रुग्णसंख्या दैनंदिन आलेखात कुठेच दिसत नाहीत. इतकंच काय, तर कोणतीही किंवा फारशी लक्षणं नसलेले हजारो बेफिकीर क्षणाक्षणाला हा रोग पसरवत आहेत. आधीच्या डेल्टा आणि कोरोना विषाणूपेक्षा ओमायक्रॉन अनेकपट वेगाने चटकन पसरत आहे. सर्वजण एकच प्रश्न विचारत आहेत, ओमायक्रॉन कधी संपणार?

दोन लसी घेतल्यानंतर आपल्याला ओमायक्रॉनची बाधा होणार नाही, अशा भ्रमात अनेकजण होते. त्यांच्या भ्रमाचा भोपळा जगभरात फुटला आहे. फायझर आणि मॉडेर्ना या लसींची प्रतिकारशक्ती भारतीय लसीच्या अनेक पटींनी जास्त आहे. म्हणून नाकं मुरडणाऱ्यांनी एकदा युरोप, अमेरिकेतले ओमायक्रॉन प्रसाराचे आकडे पाहावेत. इथे दोन वेळा लस घेतलेले लसवंत आज ओमायक्रॉनबाधित आहेत. भले रोगाची तीव्रता कमी असेल, फुप्फुसांपर्यंत त्याचा संसर्ग पोहोचत नसेल, त्यामुळे न्युमोनिया आदी गंभीर आजारांना सामोरे जावे लागत नसेल आणि साध्या तापाच्या गोळ्या-औषधांवर निभावलं जात असेल; तरीदेखील बाधितांची संख्या धडकी भरवणारी आहे. म्हणूनच अगदी एक टक्का रुग्णांना रुग्णालयात भरती करावं लागलं तरी, तो आकडा भारतासह इतर सर्व देशांमध्ये वेगाने वाढतोय. याचा अर्थ दोन लसी घेऊन आपल्यात कोणतीही प्रतिकारशक्ती निर्माण झाली नाही का? तर तसं नाही. प्रतिकारशक्ती निर्माण झाली. पण काही महिन्यांनंतर त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली एवढाच त्याचा अर्थ आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून तिसऱ्या डोसची दारं सरकारने एका विशिष्ट वयोगटासाठी खुली केली. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून त्यांचा ओमायक्रॉनपासून बचाव होईल एवढं निश्चित. त्यामुळे यापुढील आयुष्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तीन ते चार मात्रा याच ‘न्यू नॉर्मल’ आहेत हे समजणे श्रेयस्कर.

मागील लाटेपेक्षा या लाटेमध्ये काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. मागील वेळी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती पसरली होती. ऑक्सिजन, बेड, हॉस्पिटल, रेमडेसिविर यांची कमतरता होती. अनेकांची लस टोचणी झाली नव्हती. आज भाग्यवंत लसवंतांची संख्या लस न घेतलेल्यांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे प्रसार झाला तरी रुग्ण भरती आणि मृत्यू दर याची धडकी भरत नाही, हे पाहायला मिळत आहे. मग प्रश्न असा आहे की, बाधितांच्या संख्येचा जो दर आज दीड-पावणेदोन लाखांनी वाढत आहे, त्याचा उच्चांक कधी येईल? तज्ज्ञांच्या एका गटाच्या मते सर्वसाधारणपणे हीच रुग्णसंख्या वाढत जाऊन संपूर्ण देशभरातला आकडा चार-साडेचार लाखांवर स्थिरावेल आणि नंतर ज्या वेगाने त्याचा प्रसार झाला, तसाच त्या रोगाचा निचरादेखील होईल. अर्थात हे सर्व होण्यासाठी नागरिकांनी काटेकोर काळजी घेणं आवश्यक आहे. ओमायक्रॉनचा प्रसार कमी होणं हे जेवढं सरकारी धोरणांवर अवलंबून आहे, त्यापेक्षा अधिक नागरिकांच्या हातात आहे.

कोरोनाच्या या तीनही लाटांनंतर एक लक्षात आलं. कोरोनाचा संपूर्ण नाश जवळपास अशक्य आहे. त्याबरोबर राहायला शिकण्याची गरज अधोरेखीत होत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या लढाईत आपल्या ध्येयांची पुनर्मांडणी करावी लागेल. ताज्या लाटेतली एक चांगली बाब म्हणजे मागच्या लाटेप्रमाणे अर्थव्यवस्थेला मोठा तडा पडलेला नाही. अर्थचक्र व्यवस्थित सुरू आहे. इतकंच काय, तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तिमाहीचे निर्यातीचे आकडे उच्चांक गाठत आहेत. याचा अर्थ मागल्या वेळेपेक्षा आताची स्थिती खूपच चांगली आहे. एक समूह म्हणून आपण मागच्या लाटेपेक्षा अधिक शिकलो आहोत, यात शंकाच नाही. मानवी देहरचना, पेशीरचना ही उत्क्रांत होत असते. परिस्थितीशी लढत विजिगीशू वृत्ती जोपासत असते. या रचनेत एक विलक्षण शक्ती आहे आणि ती म्हणजे या आधी शरीरावर हल्ला झालेल्या विषाणूंची वैशिष्ट्यं लक्षात ठेवण्याची. इतकंच नव्हे, तर त्याच्या विरोधात नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची. या वेळी त्याचा प्रत्यय सर्वांना येत आहे. अमेरिकेतल्या एका सर्वेक्षणाचे आकडे सध्या समोर आहेत. अलीकडच्या काळात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या निम्म्याहून अधिक बाधितांनी ख्रिसमस पार्ट्या एकत्र साजऱ्या केल्या होत्या. याच्याशी साधर्म्य असणारी आकडेवारी इंग्लंडमध्ये समोर येत आहे.
याचा अर्थ जिथे गर्दी, तिकडे ओमायक्रॉनचा प्रसार हे सरळ स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा प्रसार रोखायचा असेल, तर गर्दी टाळणं, मुखपट्टीचा वापर करणं हाच एकमेव मार्ग उपलब्ध आहे.

ओमायक्रॉन लवकर संपेल, अशी आशा आहे. पण निव्वळ आशा हे धोरण अथवा जीवनशैली असू शकत नाही. त्यासाठी जितकी अधिक काळजी घेऊ, तितका लवकर ओमायक्रॉन हद्दपार होईल. हे लक्षात घेऊन आता जनसामान्यांनी काळजी घेणं आणि मागील दोन लाटांमधल्या अनुभवांतून शहाणं होत निर्बंध पाळणं गरजेचं आहे. तसं झालं तर या व्याधीचा त्रास आणि त्याची चर्चा पुढील काही दिवसांमध्येच थांबलेली असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -