Saturday, May 11, 2024
Homeताज्या घडामोडीMahavikas Aghadi : महाविकास आघाडीचे 'तीनतेरा' वाजणार!

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचे ‘तीनतेरा’ वाजणार!

लोकसभेच्या ‘या’ जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात होणार हाणामारी

मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) लोकसभा जागावाटपांवर (Loksabha Election 2024) बुधवारी बैठक होणार होती. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची दिल्लीत बैठक होती, तसेच ठाकरे गटाचे नेते १ जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चाच्या नियोजनात आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत नव्हते. त्यामुळे अशोक चव्हाण आणि अजित पवार या दोघांनी राज्यातील लोकसभेच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा केली. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १५ शिंदे गटाच्या शिवसेनेबरोबर गेले आहेत. परिणामी, उद्धवसेना गटाच्या लोकसभेच्या त्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हव्या आहेत. अशी मोर्चेबांधणी काँग्रेस, राष्ट्रवादीने चालवली आहे.

शिवसेनेच्या १५ खासदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्या १५ जागांवर उद्धव सेनेचा दावा आहे. तरीही या जागांविषयी बैठकीत बोलणी झाल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

अशोक चव्हाण म्हणाले, जिथे आघाडीच्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, तिथे जागा वाटपात विशेष अडचण नाही. मात्र जिथे पक्षांतर झालेले आहे, त्या मतदारसंघातील बदलत्या राजकीय परिस्थितीसंदर्भात विचार होणे आवश्यक आहे. काँग्रेसने मतदारसंघनिहाय मध्यंतरी आढावा घेतला. त्या आढाव्याबाबत अजित पवारांशी चर्चा केली. १७ जुलैपासून मुंबईत सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात देखिल मुद्दे मांडले, असे चव्हाण यांनी सांगितले.

“जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही”

“कोण कोणती जागा लढवणार अशी जागानिहाय चर्चा झाली नाही. तसा प्रश्नच नाही, कारण तशी चर्चा व्हायची असेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ नेते आणि मी असे तिघे असू तेव्हाच याबाबत चर्चा होऊ शकते. आज केवळ काय विचार आहे यावरच चर्चा झाली. जागावाटपाबाबत कोणतीही सखोल चर्चा झालेली नाही. काय करणे सोयीचे राहील, अशी चर्चा झाली,” असेही अशोक चव्हाणांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, तीनही पक्ष काही जागांवर दावा करत असून त्या जागा आपल्यालाच मिळाव्या यासाठी तीनही पक्ष अडून बसल्याने महाविकास आघाडीचे लवकरच ‘तीनतेरा’ वाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.

२०१९ च्या लोकसभेच्या अनेक जागांवर काँग्रेस विरुध्द शिवसेना, राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना अशा लढती होत होत्या. परंतु आता महाविकास आघाडी असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यात ताकद असणारा मतदार संघ ज्या- त्या पक्षाला द्यायचा, असा विचार पुढे आला आहे. मात्र ठाकरे गट इरेला पेटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत.

आधीच ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपावरून काही वाद आहेत. त्यात ठाकरे गटाकडून त्यांनी २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागांवर दावा सांगितला आहे. जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी एक मोठे विधान करत या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे येणा-या काही दिवसात निवडणूक लढवू इच्छिणा-या नेत्यांमध्ये आपापले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रसंगी हाणामारी होण्याचीही शक्यता आहे.

कालच्या बैठकीनंतर शिवसेनेत फूट पडून १३ खासदार शिंदे गटात गेले आहेत. या १३ खासदारांच्या जागेवर मेरीटनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी आम्हाला आशा असल्याचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यात ठाकरे गटाला सोडून गेलेल्या खासदारांच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या विधानाने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी मुंबईत विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत हे विधान केले आहे. दक्षिण-मध्य (मुंबई), उत्तर-मध्य (मुंबई), यवतमाळ, कल्याण, हातकलंगणे, कोल्हापूर, बुलडाणा, नाशिक, मावळ, हिंगोली, रामटेक, परभणी, शिर्डी या लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत सर्वाधिक संघर्ष होण्याची शक्यता आहे.

यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातून दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. या जागेवर काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत होती. खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. येथील जागेवर ठाकरे गट दावा करत आहेत. परंतु हा मतदारसंघ काँग्रेस मागत आहेत.

हातकलंगणेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे हे खासदार राहिले आहेत. तर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हेही शिंदे गटाकडे गेले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांनी चुरशीची लढत झाली होती.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटाकडे गेले आहेत. ही जागा काँग्रेस मागत आहे. मागील वेळेस काँग्रेसकडून लोकसभा लढणारे सुभाष वानखेडे हे पुन्हा ठाकरेंकडे आले आहेत. तेही येथून उमेदवारी मागत आहेत. त्यामुळे या जागेचा पेच आहे.

रामटेक मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. रामटेक मतदारसंघात कृपाल तुमाणे खासदार असून, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. या जागेवर काँग्रेसचे मुकूल वासनिक हे अनेकवेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही जागा हवी आहे.

यवतमाळच्या खासदार भावना गवळी शिंदे गटात आल्या आहेत. या जिल्ह्यात काँग्रेसचे ताकद आहे. तेथे माणिकराव ठाकरे, वसंत पुरके, शिवाजी मोघे असे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ही जागाही काँग्रेसला हवी आहे.

नाशिकचे हेमंत गोडसे हे शिंदे गटात गेलेले आहेत. ही जागा राष्ट्रवादीला हवी आहेत. तशीच परिस्थिती मावळ मतदारसंघात निर्माण झालेली आहे. मावळचे खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार येथून उमेदवार होते. या जागेवर राष्ट्रवादी दावा सांगत आहे.

मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले आहेत. या ठिकाणी काँग्रेसचे संजय निरुपम आणि कीर्तीकर यांच्यात लढत झाली. त्यामुळे ही जागा काँग्रेस मागत आहे.

दक्षिण-मध्यमध्ये शिवसेनाविरुध्द काँग्रेस अशी लढत होत होती. आता येथील खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे ही जागाही वादात आहे.

दक्षिण-मुंबईत अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे खासदार आहेत. येथे काँग्रेसचे मिलिंद देवरा हे दावेदार आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या. सध्या त्या भाजपसोबत आहेत. यामुळे अमरावतीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

मुंबई आणि विदर्भातील जागांवरून काँग्रेस व ठाकरे गटात जागा वाटपावरून मतभेद होऊ शकतात. कारण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे जुने नेते आहेत. काँग्रेसचा मतदारही या भागात आहे. तर ठाकरे गटाची ताकद आता संपलेली आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -