Thursday, May 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजIsrael Iran : युद्ध पेटले! इस्रायलचे इराणला चोख प्रत्युत्तर!

Israel Iran : युद्ध पेटले! इस्रायलचे इराणला चोख प्रत्युत्तर!

विमानतळ आणि न्यूक्लिअर साईट असलेल्या शहरात अनेक स्फोट

तेहरान : इराण आणि इस्रायलमधील (israel iran attack) तणाव वाढत असून इराणमधील इसाफहान शहरातील विमानतळावर मोठे स्फोट झाले. तसेच इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पावर देखिल हल्ला (israel iran war) केल्याचे वृत्त आहे. इराणच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, हा इस्रायलने केलेला हल्ला होता. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्र डागून त्यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

इराणने गेल्या आठवड्यात रविवारी (१४ एप्रिल) पहाटे त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्र डागली. मात्र इराणचा हा अनपेक्षित हल्ला रोखण्यात यशस्वी झाल्याचे सांगत इस्रायलने आपल्या हवाईदलाचे कौतुक केले होते. इराणने सोडलेले ३०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रं इस्रायल आणि मित्र राष्ट्रांनी नष्ट केल्याचं इस्रायलने सांगितलं होतं. इराणने १७० ड्रोन, ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १२० हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

इस्रायलने शुक्रवारी (१९ एप्रिल) सकाळी इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला.

इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याच इसाफहान प्रांतात इराणच्या न्यूक्लीअर साईट्स (अणू संशोधन कार्यक्रम) आहेत. याच भागात इराणचा युरेनियम विकास कार्यक्रमही चालू आहे.

इसाफहान प्रांतात झालेल्या हल्ल्यावरून दावा केला जात आहे की, इस्रायलने इराणचा अणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठीच हा हल्ला केला आहे. इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावाही केला आहे. अद्याप या वृत्ताची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने त्यांच्या सर्व सैन्यतळांना हाय अलर्टवर ठेवलं आहे. तसेच इराणने त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम सक्रीय केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी सकाळी काही व्यावसायिक विमानांनी पश्चिम इराणवरून जाताना कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा मार्ग बदलला. त्याचदरम्यान, इसाफहान प्रातांत स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले. व्यावसायिक विमानांनी मार्ग बदलणं आणि इसाफहान प्रांतात झालेल्या स्फोटांचा संबंध असल्याचे दावे स्थानिक माध्यमांनी केले आहेत.

दुबई एमिरेट्स आणि फ्लायदुबई एअरलाईन्सने स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता पश्चिम इराणच्या आसपास त्यांचा मार्ग बदलण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, याबाबत विमान कंपन्यांनी अद्याप कोणताही खूलासा दिलेला नाही.

दरम्यान, इस्त्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, इराणवर ड्रोन हल्ल्याचा उद्देश त्यांना सांगणे हा होता की इस्रायल इराणवर हवे असल्यास हल्ला करू शकतो. इस्त्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ इराणला इशारा देण्यासाठी त्यांच्या लष्करी जागेला लक्ष्य करण्यात आले.

तस्नीम न्यूजनुसार, इराणच्या लष्करातील आण्विक सुरक्षेचे प्रभारी अहमद हगतलाब म्हणाले होते, “जर इस्रायलने आमच्या आण्विक साइट्सवर हल्ला केला तर आम्ही निश्चितपणे प्रत्युत्तर देऊ. शत्रूची अणु स्थळे कुठे आहेत हे आम्हाला चांगलेच माहित आहे. तसेच इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर सियावोश मिहंदूस्त यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या कथित हल्ल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही.

इराणवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासाने सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमेरिकन दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना तेल अवीव, जेरुसलेम आणि बेरशेबा या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना दोन्ही देशांतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “इराण आणि इस्रायलमध्ये लष्करी अडथळे आणि दहशतवादी हल्ल्याचा धोका वाढत आहे. सुरक्षा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आम्ही ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्या सुरक्षेचा विचार करून दोन्ही देश सोडण्याचे आवाहन करतो.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -