Sunday, April 28, 2024

अचानक

परदेशात म्हणे नवरा-बायको आळीपाळीने स्वयंपाक करतात. भारतातले नवरे शक्यतो गावखेड्यातली पत्नी का करतात याचे रहस्य आता तरी समजले का वाचकांनो? तसे आपल्या कथेतील गोपाळराव तटस्थ असत. करायचे ते करा नाहीतर मरा. मला जेवायखायला वेळेत द्या म्हणजे झाले. गोपिकाबाईही सर्व करीत. गोपाळराव खूश होत. अडचण एकच होती. घरात अंकुर फुलला नव्हता! त्यामुळे बहिणीचे मूल दत्तक घेण्याचे ठरले नि चमत्कारच झाला.

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड

गोपिकाबाई सत्तत काही ना काही काम करीत असत. गोपाळराव नुसते बघे! गोपिकाला हात आहेत की यंत्र? कळतच नसे त्यांना.

‘पोळ्या लाटा
चटणी वाटा
वरण घोटा
स्वैंपाक मोठा’
गोपाळराव कवने करीत. गोपिकाबाई हसून येत बाहेर.
‘नौरोजी माझे
लाडाचे साजे
त्यांच्या मनात
कवन साजे
कवन तरी कुणावर?
जीवाच्या बायकोवर!’
त्याही वरकढी करीत. गोपाळराव खूश होत.

अडचण एकच होती. घरात अंकुर फुलला नव्हता. मूलबाळ झाले नव्हते, त्याने गोपिकाबाईंचा बांधा सडसडीतच होता.
बाकीच्या बायकांना हेवा वाटे. त्या एकमेकीत सांगत-बोलत.

पोर ना बाळ! नुसता जीवाचा काळ! आमच्याकडे बघा म्हणावं. पोरांना हगणी मुतणी काढा, दुपटी धुवा, रात्री जागवा, अभ्यास घ्या. नि बायकोला तयार मुलगा सोपवा. मग तो ऐकवणार, “आई, सुनेला मुलीसारखं वागव. ती सुद्धा दमते गं! ब्यांकेत जाते, पैसा कमावते (त्या बाबतीत आई कमकुवत होती ना!) मग थोडी मदत मी करतो तिला. स्वयंपाकात, धुण्याभांड्यात. कमीपणा काय त्यात?”

“अरे लेकरा, लग्नाआधी कुठे गेला होता रे तुझा मदतशील स्वभाव? करतेस तर कर नि मरतेस तर मर…” त्या मनी कोसत. उघड मात्र ओठ शिवून बसत. लव लव भांडी धुणारा, कांदा चिरणारा, कणिक मळणारा मुलगा बघत. गोपाळराव तटस्थ असत. करायचे ते करा नाहीतर मरा. मला जेवायखायला वेळेत द्या म्हणजे झाले. एक भाग्य करावे नि भारतीय नवरा व्हावे! लग्न होईपर्यंत आई, मग बायको, मग सूनबाई! मज्जाच मज्जा! जन्मभर! मधून मधून
सर्टिफिकेट द्यायचं.

“आमटी झकास. डिस्टिंक्शनमधे पास.”
“भात मऊसूत, मोकळा, मस्त!” (आता भातात काय आहे ना गुणवर्णन करण्याजोगो? पण करनेवाले का क्या जाता? स्तुती करनेका. स्त्री को चढानेका और ऐतोबो आयुष्य बढानेका. आपना अपना!)

परदेशात म्हणे आळीपाळीने स्वयंपाक करतात. एक दिन नवरा, एक दिन बायको. संडेको हॉटेलमे खानेका. नवरोजींच्या खिशाला दर रविवारी चाट. भारतातले नवरे शक्यतो गावखेड्यातली पत्नी का करतात याचे रहस्य आता तरी समजले का वाचकांनो? कोकणातली पोरगी करायची तर ती कामाला वाघ असते; म्हणजे पहिला नंबर मु. पोष्ट रत्नागिरी, पुळे, तळे, गणपतिपुळे (ती देवधर्माचे पण बघते.)

तर गोपिकाबाई! परत एकदा कहाणी चालू!
“अहो, आपण एखादे मूल दत्तक घेऊया काय?” पत्नीने पतीस पुसले.
“कल्पना काही वाईट नाही.” पतीने पत्नीच्या प्रस्तावास दुजोरा दिला. त्यानिमित्ताने कोवळा वावर घरात होणार होता.
“माझी बहीण अंबिका हिचा गणेश कसा वाटतो तुम्हाला?”
“छानच आहे तो.”
“मग अंबिकेला विचारू? विचारतेच!
फोनवर कल्पना देते.”

“विचार विचार. तिच्याकडे चार चार मुलगे आहेत. गणेश आपल्याकडे वारंवार पाठवते ती. लळा आहे त्याला आपला.”
गोपाळराव पत्नीस सकारात्मक प्रतिसाद देत बोलले. पत्नी ताबडतोब कामाला लागली.

“अंबिके, एक मूल दत्तक घ्यावे म्हणते मी.”
“अगं माझा गणेशच घे ना!”
“अगदी माझ्या मनातलंच बोललीस बघ तू अंबिके.”
“मलाही चार चार
मुलांचं होत नाही गं.”
“मी करेन ना गणेशचं सारं! लाडाकोडात ठेवीन त्याला.”
“थँक्स ताई.
तुझ्यावर सारा भरवसा!”
“मग ठरलं. येत्या शुक्रवारी आणून सोड.”
“म्हणजे उद्याच?”
“अंबिके शुभस्य शीघ्रम.”
“बरं बरं! उद्याच आणते गणेशला तुझ्यात.” असे बहिणी-बहिणीचे ठरले.
नि चमत्कारच झाला.
“गणेश, मावशीला ‘आई’ म्हण हं!”
“हो आई.” “तिला किती बरं वाटेल.”
“हो आई.” गणेशने शहाण्या
मुलागत होकार भरला.
दोघे आले. सामानसुमानांसह.
“हिला चक्कर येतेय.”
“का हो भावजी? ताईला बरं नाही?”

“गणेशचा पायगुण. हिला चक्कर येतेय. डॉक्टर म्हणाल्या, गुड न्यूज आहे अकरा वर्षांनी!” गोपाळराव उडी मारून म्हणाले.

“आता तुम्हाला दोन दोन मुलं. एक गणेश नि दुसरं होणारं बाळ.” असा अचानक आनंद जाहला वाचकांनो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -