Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलSparrow : चिमणीचं घरटं!

Sparrow : चिमणीचं घरटं!

  • कथा : रमेश तांबे

एक होती चिमणी. तिला आपलं घरटं बांधायचं होतं. त्यासाठी ती छानसं झाड शोधत होती. तेवढ्यात तिला दिसलं एक आंब्याचं झाड. झाड होतं खूप मोठं. त्यावर होती भरपूर पानं आणि फळं! मग चिमणी म्हणाली, “झाडा झाडा आंब्याच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा!” तसं आंब्याचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे, आधीच माझ्या अंगावर एवढी पानं आणि फळं. त्यांचाच केवढा मोठा भार झालाय मला अन् त्यात तू आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!”

मग चिमणी तिथून निघाली. उडता उडता तिला दिसलं एक पिंपळाचं झाड. झाडाची पानं सळसळ आवाज करीत नाचत होती. चिमणी गेली पिंपळाकडे आणि म्हणाली, “झाडा झाडा पिंपळाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा! तसं पिंपळाचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे आधीच माझ्या अंगावर केवढे पोपट राहातात. त्याचाच मला झालाय केवढा मोठा भार! अन् तू त्यात आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!

बिचारी चिमणी, निघाली उडत उडत. उडता उडता तिला दिसलं एक वडाचं झाड! खूप मोठं होतं झाड. झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. मग चिमणी म्हणाली, “झाडा झाडा वडाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा!” तसं वडाचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे, आधीच माझ्या पारंब्यावर किती मुलं झोके खेळतात. त्याचाच केवढा मोठा भार झालाय मला अन् त्यात तू आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!”

चिमणी उडून उडून दमून गेली. अन् बाभळीच्या झाडाखाली येऊन बसली. कोणच तिला घरटं बांधायला जागा देईना. त्यामुळे ती निराश झाली होती. तेवढ्यात तिथं कावळा आला. चिमणीला असं उदास बसलेलं बघून म्हणाला, “काय गं चिमणे, अशी का बसलीस उदास.” चिमणी म्हणाली, “काय सांगू कावळ्या, घरटं बांधायला कोणतंच झाड जागा देत नाही. मी तरी काय करू!” तसं कावळा हसत हसत म्हणाला, “अगं चिमणे काय करायचंय ते घरटं! आम्ही बघ घरटंच बांधत नाही. आमची अंडी आम्ही कोकिळाच्या घरट्यात गुपचूप ठेवूून येतो. तू पण तसंच कर!” चिमणी म्हणाली, “नाही बाई, मला नाही जमायची अशी बेईमानी. मी आपली साधी, सरळ प्रामाणिक. झाडाने हो म्हटल्याशिवाय त्याच्या अंगावर घरटंसुद्धा बांधत नाही आणि असं दुसऱ्याच्या घरट्यात चोरून अंडी टाकायची, नको रे बाबा!” चिमणीचं पुराण ऐकून कावळा गेला उडून, चिमणी राहिली तिथेच बसून!

थोड्या वेळाने चिमणी उडण्याच्या तयारीत असतानाच, बाभळीचे झाड तिच्याशी बोलू लागलं. “चिऊताई चिऊताई इकडे वर बघ मीच बोलतोय, बाभळीचे झाड! मी ऐकली तुझी कहाणी, ऐकून आले डोळ्यांत पाणी!” “मी सांगतो तुला, बांध माझ्या अंगावर घरटं. पडणार नाही तुला फार कष्ट! माझ्या अंगावर मोठी पानं नाहीत की फळं नाहीत. पोपट नाही, साळुंक्या नाहीत. काय सांगू चिमणे मी पडलोय अगदी एकटा. सारेच म्हणतात, बाभळीच्या अंगावर केवढे काटे. चिमणे, काटे आहेत पण टोचणार नाहीत बघ तुला.

मी काळजी घेईन तुझी आणि तुझ्या बाळांची! तुला बाळं झाली की मी त्यांना माझी पिवळी धमक फुलं देईन. माझ्या काळ्या, तपकिरी रंगाच्या छोट्या छोट्या बिया त्यांना खेळायला देईन.” बाभळीचं बोलणं ऐकून चिमणीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, “झाडा झाडा बाभळीच्या झाडा, तुझ्या अंगावर शोधली मी जागा. चारच दिवसांत घरटे बांधते, तुझ्याबद्दल साऱ्यांंना सांगते!”

थोड्या दिवसांत चिमणीनं तिथं घरटं बांधलं. मग अनेक चिमण्या तिथं राहायला आल्या. इतर पक्षीदेखील आले आणि एकटं पडलेलं बाभळीचं झाड आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून गेलं. एकमेकांच्या साथीने सारेच आनंदित झाले!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -