Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककोलाजशरदाचे चांदणे

शरदाचे चांदणे

डॉ. लीना राजवाडे

वाचक हो, मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याचेवर आपला हा जीव अवलंबून आहे, अशा रक्ताची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हेही समजले पाहिजे. या लेखात निसर्गातील कोणते बदल सजग राहून तसा आहार विहार ठेवल्याने हे साधता येऊ शकते ते पाहू.

निसर्ग स्वतःहून खरं तर हा समतोल बिघडू न देण्यासाठी आपले कालचक्र अजून तरी बरेच अंशी प्रयत्नशील असतो. शास्त्रात सांगितलेले ऋतुचर्येतील आहार-विहारातील नियम जो मनुष्य सांभाळून आचरण करतो, त्याला ऋतुनुसार कमी-जास्त होणारे वातादी दोष उपद्रव स्वरूप ठरत नाहीत. हे या लेखात पुन्हा सांगण्याचे कारण, रक्ताला संकटात टाकणारे, वातावरणातील बदल हे आपल्या नियंत्रणात नाहीत. तरी आपले खाणे-पिणे तरी नक्कीच आपल्याला नियंत्रणात आणता येते. गरज आहे ते समजून करण्याची. पावसाळा अजून काही काळ असेल, साधारणपणे परतीचा पाऊस असे म्हटले तरी हळूहळू ऊन देखील कडक होऊ लागले आहे. हवा गरम होऊ लागली आहे. थोडक्यात ऋतू संधिकाल सुरू झाला आहे. पावसाळा संपून शरदाची चाहूल लागते आहे. संधिकालात पावसाळ्यातील ऋतुचर्या ठेवायचीच आहे, हळूहळू पित्तकाल जवळ येणार आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. आता शरद ऋतूतील हितकर गोष्टी कोणत्या हे समजावून घेऊ.

  • शरद ऋतूत आहारात पुढील गोष्टींचा समावेश विशेष करून करावा. तूप, मधुर, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ, पचायला हलके पदार्थ, साखर, खडीसाखर, आवळा, पडवळ, मध, उसाचा रस, जांगल प्राणी कोंबडीचे सूप, गहू, जच, मूग, तांदूळ, दही, आंबट, तिखट रस, तीक्ष्ण उष्ण पदार्थ वर्ज करावे.
  •  व्यायाम दिवसा झोपणे, उन्हात फिरणे टाळावे.
  • अगस्ती तारा उदयाला येतो. त्यानंतर दिवसा सूर्यकिरणांनी, रात्री चंद्र किरणानी थंड झालेले, निर्विष पाणी पिण्यासाठी उत्तम. हंसोदक अशी याला शास्त्रात संज्ञा आहे. पंचांगात किंवा केलेंडरमध्ये अगस्ती उदय लिहिलेला असतो. ते पाहावे.
  • ज्या व्यक्तींना पित्ताचे विकार होतात, त्यांनी तर विशेषकरून वरील पथ्यापथ्य सांभाळावे.
  • खाण्या-पिण्याच्या सवयींबरोबर विहार कसा असावा, याचाही शास्त्रात निर्देश आहे. प्रसन्न वाटेल अशा प्रकारचे कपडे, अलंकार घालावेत, सुगंधी फुले केसात माळावीत. मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्या सोबत बागेत मजेत वेळ घालवावा. याचा परिणाम मन आनंदी राहाते. ताणरहित राहिल्याने उत्साह वाटतो, रक्त शरीरात निरोगी रहायला मदत होते.
  • ऑगस्टमध्य ते ऑक्टोबरमध्य असा हा कालावधी असतो. तेव्हा शरद ऋतूतील चर्या सांभाळावी, तर शरदातील टिपूर चांदणं, मसाला दूध यामुळे आनंदमयी होईल. रक्ताचे स्वास्थ्य टिकायला मदत होईल.
  • पावसाळ्यात थंड हवा ज्यामुळे वात दोष प्र कुपित होतो, त्याच्या जोडीला सूर्याच्या तप्त किरणांमुळे शरद ऋतूत पित्त देखील प्रकुपित होते. त्यामुळे ऋतू बदल होताना नक्कीच, पण एकूणच योग्य प्रमाणात पित्ताचे शमन होईल, त्याचे वाढलेले तीक्ष्ण उष्ण गुण रक्ताला त्रासदायक होणार नाहीत यासाठी ऋतुचर्येचे नियम पाळून राहावे.
  • ऋतुचर्या याविषयी मी लिहिलेल्या लेखात सांगितले होते. विसर्ग काल हा माणसाला निसर्गाकडून ताकद मिळण्याचा काळ असतो. पावसाळ्यापासून त्याची हळूहळू सुरुवात होते. शरदात ते मध्यम होते. पुढे थंडीत उत्तम मिळते. याचे कारण वरील विवेचनातून स्पष्ट होईल.
  • रक्ताशी साहचर्यानी राहणारा शरीरातील घटक म्हणजे पित्त होय. ते वाढून बिघडण्याचा मोठा कालावधी म्हणजे शरद ऋतू होय. त्यामुळे ते पित्त खराब होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून ऋतू चर्या पाळावी. तरीही याखेरीज ज्यांचे रक्त बिघडते त्यांनी योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपाय योजना करावी.
  • रक्त हे जीवन आहे. ते चांगले राहावे यासाठी आणखीनही गोष्टी समजणे महत्त्वाचे आहे. निसर्गातील सातत्याने येत राहणारे, त्यापरत्वे होणारे बदल जसे यासाठी कारणीभूत असतात, तसेच आणखीन विषय आहेत. विरुद्धान्न सेवन हा आहाराशी निगडित असणारा महत्त्वाचा विषय. त्याविषयी जाणून घेऊ पुढील लेखात.

तेव्हा वाचक हो, आपण सारे, शरद ऋतुचर्या सांभाळत, कोजागरी पौर्णिमेला शरदातील चांदण्याचा आनंद नक्की घ्याल, याची खात्री वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -