Thursday, August 27, 2026

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ महिन्यांची बंदी घातली आहे. आसिफने ICCची ही कारवाई स्वीकारली असून, त्याची बंदी ८ सप्टेंबर २०२५ पासून ७ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. आसिफच्या ८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या स्पर्धेबाहेरील डोपिंग चाचणीमध्ये मेस्टेरोलोन या प्रतिबंधित पदार्थाचा मेटाबोलाइट आढळून आला होता. त्यानंतर ICCने या प्रकरणाची चौकशी केली. आसिफने ICC अँटी-डोपिंग कोडच्या कलम २.१चे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे.

या प्रकरणात आसिफने जागतिक अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) आणि ICCसोबत Case Resolution Agreement केला. त्यानुसार प्रस्तावित १५ महिन्यांची शिक्षा त्याने स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणासाठी स्वतंत्र औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता राहिली नाही. या कारवाईचा परिणाम त्याच्या मागील सामन्यांच्या निकालांवरही झाला आहे. ८ सप्टेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत आसिफने मिळवलेले वैयक्तिक निकाल अमान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीतील त्याची पदके, गुण, बक्षिसाची रक्कम आणि इतर पुरस्कार काढून घेतले जाणार आहेत. मात्र, बंदीदरम्यान त्याला क्रिकेटशी पूर्णपणे दूर राहावे लागणार नाही. ICCच्या निर्णयानुसार ८ ऑक्टोबर २०२६पासून आसिफला प्रशिक्षण घेण्याची परवानगी असेल. मात्र स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी त्याला ८ डिसेंबर २०२६पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

आसिफ खान हा UAEच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. २०२२मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर त्याने UAEसाठी आतापर्यंत ३८ एकदिवसीय सामने आणि ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याच्यावर झालेली ही कारवाई UAEच्या क्रिकेटसाठी मोठा धक्का मानली जात आहे. ICCच्या अँटी-डोपिंग नियमांनुसार खेळाडूंनी आपल्या शरीरात प्रतिबंधित पदार्थ जाणार नाहीत याची जबाबदारी घ्यावी लागते. आसिफने प्रकरण मान्य करून शिक्षा स्वीकारल्यामुळे आता त्याच्या पुनरागमनाकडे UAE क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ८ डिसेंबर २०२६ रोजी बंदी संपल्यानंतर आसिफ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >