Thursday, August 27, 2026

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकत एका नायजेरियन नागरिकासह स्थानिक संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे हलीवली परिसरात एकच खळबळ उडाली असून कर्जत परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाने सिग्नेचर डिझायर इमारतीत कारवाई केली. अचानक झालेल्या या कारवाईदरम्यान एका नायजेरियन नागरिकाला तसेच एका स्थानिक संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी सुरू असून त्यांचे अंमली पदार्थांच्या व्यवहारातील संभाव्य संबंध तपासले जात आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून अंमली पदार्थांचा साठा किंवा अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांची विक्री अथवा पुरवठा करणारे जाळे कार्यरत आहे का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून दोन्ही संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असून अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, त्यांचे स्थानिक पातळीवरील संपर्क कोण आहेत आणि या व्यवहारामागे आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्जतसह रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः तरुणांना या विळख्यात ओढणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर कर्जत परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारावर पोलिसांची नजर अधिक कडक झाली असून पुढील तपासात आणखी कोणाची नावे समोर येतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा