Wednesday, August 26, 2026

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य नाही

मुंबई : ‘रॅपिडो’शी काही मंत्र्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा तसेच कार्यक्रमांना प्रायोजकत्व मिळाल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी यासंदर्भात ठोस कागदपत्रे आणि पुरावे सादर करावेत, असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी बुधवारी दिले. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन त्यांनी राऊतांना पत्र लिहून केले आहे. (Sanjay Raut)

संजय राऊत यांनी अलीकडेच परिवहन विभागाला पत्र लिहून बाईक टॅक्सीच्या निर्णयामुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर संकट येईल, असा दावा केला होता. तसेच या प्रकरणात मंत्र्यांवर संशय व्यक्त केला होता. या पत्राला सविस्तर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर राजकारण करणे योग्य नाही. बाईक टॅक्सीमुळे एकीकडे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत, तर दुसरीकडे पारंपरिक रिक्षाचालकाचा रोजगार आणि सामाजिक सुरक्षा सुरक्षित ठेवणे हीदेखील सरकारचीच जबाबदारी आहे. ही दोन्ही चाके समतोलपणे चालवावी लागतील, असे त्यांनी नमूद केले. (Pratap Sarnaik)

रॅपिडो असो किंवा कोणतीही अन्य कंपनी, सरकारपेक्षा मोठे कोणीही असू शकत नाही आणि नियमांपेक्षा वरचे स्थान कोणालाही दिले जाणार नाही, असे स्पष्ट करत सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, परिवहन विभागाचे निर्णय कोणत्याही ओळखीवर नव्हे तर कायदेशीर नियमांवर चालतात. तसेच संजय राऊत यांनी नाशिक ते मंत्रालय काढलेल्या मोर्च्याच्या भूमिकेवर बोलताना, आंदोलनाला परवानगी नाकारली असेल तर त्यामागची प्रशासकीय कारणे तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सुचवले. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हवे तर 'सामना'च्या कार्यालयातही यायला तयार असल्याचे सांगत, राजकारण कमी आणि वस्तुस्थितीवर अधिक चर्चा करूया, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >