- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे आयोजित करण्यात येणारा महाप्रसाद आणि भंडारा अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नियमांच्या अधीन असणार आहे. सण-उत्सव कोणताही असला तरी अन्न सुरक्षा कायद्यानुसार 'फूड बिझनेस ऑपरेटर' म्हणून नोंदणीकृत परवाना घेणे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित ‘मीट द मीडिया’ कार्यक्रमात त्यांनी अन्न सुरक्षेच्या मुद्यावर प्रशासनाची भूमिका मांडली. (FDA Inspections)
शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न व औषध प्रशासनाने आता आपला मोर्चा ...
गणेशोत्सवात वितरीत केल्या जाणाऱ्या महाप्रसादावर एफडीएची नजर असणार का, या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, हा विषय सण किंवा उत्सवाचा नसून तो नियमांच्या अंमलबजावणीचा आहे. कायद्यानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकाने परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना किंवा मानकांशिवाय अन्नपदार्थ तयार करणे हा नियमभंग ठरतो, त्यामुळे फेस्टिव्ह सीझन असो वा नसो, नियमांचे पालन ही एक नियमित प्रक्रिया आहे. गणेशोत्सव असो, ईद किंवा अन्य सण, महाप्रसाद करणाऱ्या आयोजकांनीही या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. (FDA Inspections)
३ हजार १०० हून अधिक आस्थापनांची तपासणी
अन्न सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत एफडीएने ३१ जुलैपर्यंत राज्यभरात अन्न क्षेत्रातील ३ हजार १०० हून अधिक आस्थापनांची तपासणी केली आहे. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६५ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत, तर ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारवाईनंतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी स्वतःहून स्वयंपाकघराचे नूतनीकरण व स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे सांगत, व्यावसायिकांनी स्वतःहून नियमांचे पालन केल्यास नियामकाची गरजच उरणार नाही, असा विश्वासही मुंढे यांनी व्यक्त केला. (FDA Inspections)






