Saturday, August 15, 2026

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे

रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे महत्त्व आजही कायम आहे. चित्रपटसृष्टीतही सख्खे भाऊ-बहीण नसतानाही हे नाते आयुष्यभर जपणाऱ्या काही कलाकारांच्या आठवणी विशेष आहेत.

१९५५ साली प्रदर्शित झालेल्या देवेंद्र गोएलनिर्मित आणि राज ऋषी दिग्दर्शित ‘वचन’ या चित्रपटात अभिनेत्री गीता बाली यांच्या धाकट्या भावाची भूमिका अभिनेते राजेंद्र कुमार यांनी केली होती. त्या चित्रपटात काही अत्यंत भावस्पर्शी प्रसंग (सीन) असल्याने दोघेही कलावंत त्यासाठी कठोर परिश्रम घेत होते. बहीण-भावाच्या व्यक्तिरेखांशी दोघेही इतके समरसून गेले की दोघांमध्ये बंध निर्माण झाले. चित्रपटातील आपापल्या व्यक्तिरेखा साकारत असतानाच त्या दोघांमध्ये तेच नाते निर्माण झाले. कालांतराने चित्रपट पूर्ण झाला. तो प्रदर्शित झाल्यानंतर दोघे कलावंत पूर्ववत आपापल्या दैनंदिन जीवनात रममाण झाले. काळ पुढे सरकला आणि गीता बाली यांच्या मनात घरच्या निर्मिती संस्थेतर्फे एका चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार आला. या चित्रपटातील नायकाची भूमिका राजेंद्र कुमार यांना देण्यासाठी गीता बाली यांनी त्यांना विचारले; परंतु नियोजित चित्रपटाची कथा राजेंद्र कुमार यांना ऐकविण्यात आली तेव्हा त्यांनी गीता बाली यांच्या त्या चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला. गीता बाली यांना याचे आश्चर्य वाटले. त्यांनी दूरध्वनीवरून राजेंद्र कुमार यांना नकाराचे कारण विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘वचन’मध्ये मी तुमचा भाऊ झालो होतो. त्या वेळी मी तुम्हाला मनापासून बहीण मानले. आता केवळ चार पैसे अधिक मिळविण्यासाठी तुमचा नायक होणे मला शक्य नाही. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या बहिणीचा नायक बनू शकत नाही. दूरध्वनीवरून बोलताना राजेंद्र कुमार जे काही म्हणाले ते ऐकून गीता बाली काही क्षण स्तब्धच झाल्या! त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. सद्गदित झालेल्या गीता बाली यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले... ‘मला अभिमान वाटतो तुझ्यासारख्या भावाचा...!’

हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेले दुसरे असेच एक नाते! सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांचे संगीत लाभलेल्या एका चित्रपटातील एका गीताची रंगीत तालीम ध्वनिमुद्रणाच्या स्टुडिओत सुरू होती. ती पूर्ण झाल्यावर ते गीत गाणाऱ्या पार्श्वगायिका लता मंगेशकर त्या गीताच्या ध्वनिमुद्रणासाठी तयार होत्या; परंतु त्या वाद्यवृंदातील एक वादक त्याच्या वाद्यावर एक तार मंद वाजवत होता. मदन मोहन यांनी त्याला तार सूरबद्ध करण्यास सांगितले; परंतु मदन मोहन यांनी त्याला तसे तीन-चार वेळा सांगूनही तो वादक वाद्य तसे वाजवत नव्हता. मदन मोहन यांनी त्याला पुन:पुन्हा बजावूनही तो वादक वारंवार तीच चूक करीत राहिला, तेव्हा मात्र मदन मोहन कमालीचे संतापले! स्टुडिओतील एका काचेवर स्वत:चा हात आपटून ते त्या वादकावर ओरडून म्हणाले, मी केव्हापासून सांगतोय की तार सूरबद्ध कर म्हणून! आपल्या कामात चालढकल करतो आहेस की काय? आपल्या उपजीविकेचा खेळखंडोबा करू पाहतोयस?

ही घटना घडल्यावर मदन मोहन यांचा हात रक्तबंबाळ झाल्याचे दिसताच स्टुडिओत एकच धावपळ उडाली! मदन मोहन यांच्या हातातून वाहणारी रक्ताची धार थांबविण्यासाठी मलमपट्टी केली जाण्यापूर्वीच लता मंगेशकर ध्वनिमुद्रणाच्या कक्षातून ताबडतोब बाहेर आल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या साडीचा पदर फाडून तो मदन मोहन यांच्या हाताला झालेल्या जखमेवर बांधला! त्यानंतर काही दिवसांनी आलेल्या रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी लता मंगेशकर यांना मदन मोहन म्हणाले, त्या दिवशी तुम्ही माझ्या हाताला झालेल्या जखमेतून होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी माझ्या मनगटावर तुमच्या साडीच्या पदराचा जो तुकडा बांधला होता तो आता मी जेव्हा केव्हा या जगाचा निरोप घेईन तेव्हा माझ्याबरोबरच जाईल! त्यानंतर या दोघा श्रेष्ठ कलाकारांनी आपले बहीण-भावाचे नाते आजन्म जपले!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा