Saturday, August 15, 2026

अंतरंग

अंतरंग

- नक्षत्रांचे देणे; डॉ. विजया वाड

उद्योगपती आत्मानंद परब यांचे दुःखद निधन.” “वयाच्या ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.” प्रसारमाध्यमे बातम्या देण्याचे काम करीत होती. विभावरीचे डोळे टचकन भरून आले. आत्मानंद परब काही काळ पती होते तिचे! त्यांचा आत्मानंदी स्वभाव, बायकोच्या आवडीनिवडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, स्वतःतच रमून जाण्याची वृत्ती तिला सहन झाली नाही. “मी वेगळे व्हायचे ठरविले आहे.” ती एकदा नेटाने धीर करून म्हणाली. “का गं?” “आत्मानंद, तुम्ही स्वतःतच रममाण असता.” “अगं, उद्योगधंद्याचा व्याप किती वाढवला आहे मी!” “पण बायकोची हौस किती पुरवली.” “माझा व्याप समजून घे विभावरी.” “समजून घेण्याची माझ्यात सहनशक्ती उरली नाही.” “मग तुझा रस्ता तुला मोकळा आहे.” “म्हणजे?” “वेगळं होऊ या.” “तुम्हांला सुद्धा तसंच वाटतं ना? मग धीर करून वेगळी होते.” “तुला चांगली नोकरी आहे विभा!” आत्मानंद म्हणाले. “हो. आहे ना! मी काही तुमच्यावर किंवा तुमच्या रुपयांवर अवलंबून नाही.” ती तोऱ्यात म्हणाली. “पण एकट्या बाईकडे समाज सामान्य, ऍव्हेलेबल स्त्री म्हणून अजूनही बघतो. एवढं एकच कारण आहे, तुमची सौभाग्यवती म्हणून राहण्याचं!” तिचा धीर आता चेपला होता. नाहीतरी वेगळे व्हायचे असे ठरविलेच होते. मग आता भीड, भीती, भयशंका कशाला हवी? “मग कधी वेगळं होऊया?” त्याने सहजपणे प्रश्न केला. जणू त्याला ‘वेगळे होणे’ या प्रकाराचे भय वाटत नव्हते. “मी ऑफिसच्या क्वार्टर्ससाठी अर्ज केला आहे. वर्किंग वुमन्स हॉस्टेलसाठी सुद्धा अर्ज केलाय. जिथे लवकर जागा मिळेल, तशी मी वेगळी राहीन. आता सोसण्याचे दिवस संपले असे समजेन. काळ बदलला आहे. आता कितीतरी स्त्रिया स्वतंत्र राहतात. विशेषतः मोठ्या शहरात! त्याचं काही अवडंबर माजवलं जात नाही.” “मी ही मदत करतो, तुला वेगळी जागा शोधतो. जो लवकर जागा शोधेल तिथे मी जाऊन राहतो. तुला या घराची सवय आहे तेव्हा... तू इथेच राहा.” असे ते वेगळे झाले. वेगवेगळे राहू लागले. नोकरीत सकाळ ते संध्याकाळ वेळ जाई. त्यामुळे तिला फारसे जड गेले नाही. घरी येताना ती बाहेरच खाऊन येई. घरी सायंकाळचे जेवण म्हणजे नुसता मऊ भात! वेळ घालवायला टीव्ही असेच. लोक काय? चार दिवस बोलले नि मग चूप झाले. त्यांना त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स काय कमी होते? अशात आनंद भेटला. सुदृढ, समंजस नि अंतरंग साफसुतरे. मने जुळली. दुसरे सहीवाले लग्न दोघांनी केले. लोक थोडे दिवस बोलले. मग आपापल्या व्यवहारात नेहमीसारखे गुंतले. उ‌द्योगपती ‘आत्मानंद परब यांचे दुःखद निधन’ ही बातमी वाचून तो बायकोला सहजपणे म्हणाला, “विभावरी, चल आत्मानंदांना बघायचे असेल तर मी घेऊन जाईन.” “काय?” तिला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. “हे बघ विभा, माणूस लग्न करतो, ते काही मनाशी बाळगून. खरं ना?” “अगदी खरं.” “आत्मानंदांशी तू लग्न केलेस तेव्हा कितीतरी बेत तुझ्या मनात असतील. छोटी मोठी स्वप्नं तुला बघायला आवडतात हे मला चांगलं ठाऊक आहे गं विभावरी.” “पण ती सारी स्वप्नं चूरचूर झाली. ते स्वतःतच इतके गुंतले होते की कधीकधी मला वाटायचं, का आपण या माणसाच्या मोहात पडलो?” “चला आता उ‌द्योगपतींना बघायला, दर्शनासाठी माणसं जमतील. माणूस म्हणून आपण चांगलेच आहोत गं विभा.” “चला.” आणि ते दर्शनाला गेले मित्रांनो. काही माणसांचे अंतरंग स्वच्छ, निर्मळ असते. खरं ना?

   
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा