Saturday, August 15, 2026

लोककल्याणकारी तेजस्विनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी

लोककल्याणकारी तेजस्विनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी

- मनस्विनी; पूर्णिमा शिंदे

धर्मशीलता, दानशूरता, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा अद्भुत संगम असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कर्तृत्वाची आधुनिक भारताला आजही तितकीच गरज आहे.

इतिहासाच्या पानांवर काही व्यक्तिमत्त्वे केवळ राजे-राण्या म्हणून नोंदली जात नाहीत, तर आपल्या कर्तृत्वाने ती युगपुरुष आणि युगस्त्री ठरतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे असेच एक तेजस्वी, असामान्य आणि आदर्श व्यक्तिमत्त्व. धर्मशीलता, दानशूरता, न्यायबुद्धी, प्रशासनकौशल्य, शौर्य, संवेदनशीलता आणि लोककल्याणाची तळमळ या सर्व गुणांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.

चोंडी गावचे मानकोजी शिंदे यांची ही तेजस्वी, बुद्धिमान आणि कुशाग्र कन्या. विवाहानंतर त्या होळकर घराण्यात दाखल झाल्या. सासरे मल्हारराव होळकर आणि सासू गौतमाबाई यांनी त्यांच्यावर लेकीप्रमाणे माया केली. मात्र, त्यांच्या आयुष्यात संसारसुख फार काळ टिकले नाही.

इ.स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात खंडेराव होळकर तोफेच्या गोळ्याने मारले गेले. अवघ्या २९व्या वर्षी अहिल्यादेवींवर वैधव्याचे दुःख कोसळले. पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा त्यांचा निर्णय होता. मात्र, मल्हाररावांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. सासऱ्यांची आज्ञा प्रमाण मानून अहिल्यादेवींनी सती जाण्याचा निर्णय सोडला आणि उर्वरित आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतले.

अहिल्यादेवींच्या आयुष्यात दुःखाची मालिका थांबली नाही. पतीनंतर सासू-सासरे, पुत्र मालेराव आणि पुढे कन्या मुक्ताबाईच्या आयुष्यातील दुःखद प्रसंगांनी त्यांना अंतर्बाह्य हादरवून सोडले. मात्र, प्रत्येक आघातानंतर त्या अधिक खंबीर झाल्या.

मल्हाररावांच्या निधनानंतर होळकर संस्थानाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची होती. राज्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणारे अनेक सत्ताकांक्षी लोक होते. अशा परिस्थितीत अहिल्यादेवींनी राज्याची घडी विस्कटू दिली नाही. प्रशासन मजबूत केले. लष्करी सामर्थ्य वाढविले. महसूल व्यवस्था सक्षम केली. प्रजेच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

त्यांच्या राज्यकारभारात कठोरता होती; पण ती अन्यायाची नव्हे, तर न्यायाची होती. धर्मनिष्ठा होती; पण धर्मांधता नव्हती. दानशूरता होती; पण दिखावा नव्हता.

महेश्वरचे वैभव नर्मदेच्या काठावर वसलेल्या महेश्वरला अहिल्यादेवींनी आपल्या राज्यकारभाराचे केंद्र बनविले. त्यांच्या वास्तव्यामुळे महेश्वरच्या वैभवात मोठी भर पडली. सुंदर घाट, मंदिरे, धर्मशाळा, अन्नछत्रे, प्याऊ, विहिरी आणि इतर सार्वजनिक सुविधा त्यांनी उभारल्या.

महेश्वर हे केवळ राजकीय केंद्र राहिले नाही, तर ते धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही विकसित झाले. संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. विद्वानांना आश्रय मिळाला. कलावंत आणि कारागिरांना प्रोत्साहन मिळाले. महेश्वरी वस्त्रपरंपरेला चालना मिळाली. नर्मदेच्या काठावरील भव्य घाट आणि मंदिररचना आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. काशी, गया, सोमनाथ, उज्जैन, नाशिक, अयोध्या, द्वारका यांसह देशातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले. मंदिरांसोबतच यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, अन्नछत्रे आणि पाण्याची व्यवस्था केली.

शाहीर अनंत फंदी यांनी महेश्वरच्या वैभवाचे वर्णन करताना नर्मदातटावरील घाट, मंदिररचना आणि त्यांच्या भव्यतेचे गुणगान केले आहे. त्यांच्या कार्यामुळे महेश्वरला एक वेगळीच सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली.

अहिल्यादेवींच्या दानधर्माविषयी अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भ आढळतात. मात्र, त्यांच्या दानशीलतेचा खरा अर्थ केवळ मोठ्या रकमा खर्च करण्यात नव्हता. त्यांनी वैयक्तिक संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी केला.

राज्याच्या खजिन्याचा आणि स्वतःच्या खासगी संपत्तीचा वापर यामध्ये त्यांनी स्पष्ट भेद ठेवला होता, असे समकालीन कागदपत्रांमधून दिसून येते. धर्मकार्यासाठी राज्याच्या तिजोरीचा गैरवापर केल्याचा आक्षेप उपस्थित झाल्यानंतर त्यांनी खर्चाचा सविस्तर हिशोब सादर केला, असा उल्लेख ऐतिहासिक संदर्भांमध्ये आढळतो. यातून त्यांच्या आर्थिक शिस्तीचे दर्शन घडते. दानशूरता आणि आर्थिक शिस्त या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जपणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते.

शौर्य आणि प्रशासनाचा संगम अहिल्यादेवी केवळ धर्मशील आणि दानशूर राणी नव्हत्या. त्या कुशल प्रशासक आणि धाडसी राज्यकर्त्या होत्या. युद्धशास्त्राचे ज्ञान, सैन्यव्यवस्थेची जाण, महसूल आणि अर्थकारणाची समज तसेच माणसांची पारख करण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यात होती.

राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी लष्करी सामर्थ्य उभे केले. महिला आणि सैनिकांना युद्धकौशल्याचे प्रशिक्षण देण्यालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट होता.

राज्यात चोर-दरोडेखोरांचा उपद्रव वाढला असताना त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला. जो कोणी या दरोडेखोरांना पकडेल, त्याच्याशी आपल्या कन्येचा विवाह करण्याची घोषणा त्यांनी केली. या आव्हानाला यशवंतराव फणसे यांनी प्रतिसाद दिला आणि पुढे त्यांचा कन्या मुक्ताबाईशी विवाह झाला. समाजाच्या चौकटीपलीकडे जाऊन योग्य निर्णय घेण्याचे धाडस त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.

अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रजेला केंद्रस्थानी ठेवणारी त्यांची भूमिका. राज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर लोकांच्या सुख-दुःखाची जबाबदारी आहे, ही जाणीव त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे होती.

प्रजेच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्या सदैव तत्पर असत. न्याय देताना जात, धर्म, पंथ किंवा सामाजिक स्थान यांचा विचार केला जात नसे. सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता त्यांच्या राज्यकारभाराचा महत्त्वाचा आधार होता.

धर्मस्थळांची उभारणी करतानाच त्यांनी सार्वजनिक सुविधा निर्माण केल्या. रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा, अन्नछत्रे आणि पाणपोया उभारून सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाला आधार दिला. त्यामुळे त्यांच्या दानधर्माला केवळ धार्मिक स्वरूप न राहता त्याला लोककल्याणाची व्यापक दिशा मिळाली. वैभवशाली होळकर घराण्यातील सून असूनही अहिल्यादेवींनी व्यक्तिगत सुख आणि ऐश्वर्य यांचा मोह धरला नाही. पतीच्या निधनानंतर त्यांनी वैराग्यपूर्ण जीवन स्वीकारले. साधेपणा, संयम आणि शिवभक्ती त्यांच्या जीवनाचा आधार बनले.

मात्र, हा वैराग्याचा मार्ग समाजापासून दूर जाणारा नव्हता. उलट, त्यांनी स्वतःला अधिक व्यापक अर्थाने समाजासाठी समर्पित केले. प्रपंचाचा त्याग केला, पण लोककल्याणाचा ध्यास घेतला. अध्यात्म आणि प्रशासन, वैराग्य आणि कर्तव्य, शौर्य आणि करुणा यांची सांगड त्यांनी घातली. म्हणूनच अहिल्यादेवींचे व्यक्तिमत्त्व एका चौकटीत बंदिस्त करता येत नाही. त्या आदर्श सून होत्या, आदर्श माता होत्या, धर्मशील स्त्री होत्या, कुशल प्रशासक होत्या, धाडसी राज्यकर्त्या होत्या आणि लोकमाता म्हणून जनमानसात अजरामर झाल्या.

आज देश विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जात असताना अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, आर्थिक शिस्त, न्यायनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, महिला सक्षमीकरण, लोककल्याण आणि सार्वजनिक संपत्तीचा योग्य वापर या सर्व बाबतीत त्यांच्या कार्यातून आजच्या राज्यकर्त्यांना आणि समाजाला मार्गदर्शन मिळू शकते.

सत्ता ही उपभोगासाठी नसते, तर जनतेच्या सेवेसाठी असते, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो. वैयक्तिक दुःख कितीही मोठे असले, तरी कर्तव्यापासून विचलित न होता समाजासाठी जगता येते, हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात धर्मशील मन, दानशूर वृत्ती, दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व या सर्व गुणांचा अद्भुत संगम होता. म्हणूनच त्यांचे जीवन आजही प्रेरणादायी ठरते. कवी दत्तू आप्पा तुळजापूरकर यांनी अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वाला आपल्या काव्यातून वंदन केले आहे. त्यांच्या काव्यातील ‘समाजसुधारक, कलोपासक, शिवभक्त, कीर्तिमान, सर्वगुणसंपन्न लोकमाता’ ही विशेषणे अहिल्यादेवींच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचीच ओळख करून देतात.

मराठ्यांच्या इतिहासातील तेजस्वी वीरांगनांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अद्वितीय आणि असामान्य आहे. त्यांनी सत्ता मिळवली म्हणून त्या मोठ्या ठरल्या नाहीत; तर सत्ता मिळाल्यानंतरही तिचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी केला म्हणून त्या महान ठरल्या.

त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे दुःखावर कर्तृत्वाने केलेली मात, वैराग्यातून निर्माण झालेली लोकसेवा आणि सत्तेतून प्रस्थापित झालेली न्यायव्यवस्था होय. अशा या पुण्यश्लोक, लोकमाता, धर्मशील आणि कर्तृत्ववान अहिल्यादेवींच्या चरणी शब्दही अपुरे पडतात. त्यांच्या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा! शतशः नमन!

   
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा