Saturday, August 15, 2026

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड

मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्ट यांसारख्या प्रसिद्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या राज्यभरातील डार्क स्टोअर्स आणि गोदामांवर धाडी टाकून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत ८६ ऑनलाईन आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या १४ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून एका आस्थापनेचे कामकाज तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (FDA Raid)

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या "सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" या विशेष मोहिमेअंतर्गत १२ आणि १३ ऑगस्ट २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. मुंबईसह पुणे, नाशिक आणि इतर शहरांतील ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या डार्क स्टोअर्समध्ये अन्न सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्याचे एफडीएच्या पाहणीत उघड झाले. मुंबईतील घाटकोपर येथील ब्लिंकिट स्टोअरमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव, कुजलेल्या भाज्या आणि अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली, तर मालाड पश्चिम येथील ब्लिंकिट स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आला. वांद्रे येथील इन्स्टामार्टच्या 'राजिडी रिटेल' वेअरहाऊसमध्ये उंदरांची विष्ठा आणि पाल आढळून आली. तर अंधेरीतील झेप्टोच्या स्टोअरमध्ये मुदत संपलेले चिकन अयोग्य तापमानात साठवल्याचे दिसून आले. (FDA Raid)

राज्यातील इतर शहरांतही एफडीएच्या पथकांनी कारवाईचा बडगा उगारला. पुण्यातील लोहेगाव येथील झेप्टो स्टोअर आणि कर्वेनगर येथील स्विन्स्टा या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कराड येथील ब्लिंकिट स्टोअरच्या १२५ दुचाकीस्वारांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रे नसल्याने तिथे डिलिव्हरी रोखण्याचे आदेश देण्यात आले, तर नाशिकमधील सिडको परिसरातील झेप्टो स्टोअरमध्ये अन्नपदार्थांच्या रॅकवर झुरळांचा मुक्त वावर आणि गंजलेले रॅक्स आढळून आले.

या मोहिमेदरम्यान गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक १३ मध्ये असलेल्या 'बॉलीवूड कॅफे'चीही एफडीएच्या पथकाने अचानक तपासणी केली. तेथील स्वयंपाकघरात सांडपाणी, घाण, मोठ्या प्रमाणावर माश्यांचा प्रादुर्भाव आणि गंजलेल्या अस्वच्छ भांड्यांमध्ये अन्न शिजवले जात असल्याचे निदर्शनास आल्याने कॅफेला 'एफएसएस ॲक्ट २००६' च्या कलम ६९ अंतर्गत दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. (Bollywood Cafe)

'हॉटेल सयाजी'चा परवाना निलंबित

या मोहिमेत ऑनलाईन स्टोअर्ससोबतच राज्यभरातील १०९ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांचीही तपासणी करण्यात आली. यात लोणावळ्यातील प्रसिद्ध 'हॉटेल सयाजी'चा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून नाशिकमधील हॉटेल वास्को, सेलेब्रिटा रेस्टॉरंट आणि हॉटेल माउलीवरही कारवाई झाली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोकण आणि पुणे विभागांतून ४६ लाख ७६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करून १० एफआयआर दाखल करत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पनवेलमध्ये ६९८ लिटर निकृष्ट दूध आणि वाशीममधून १६ लाख ९७ हजार रुपयांचे खुले सोयाबीन तेल जप्त करण्यात आले असून दोन दिवसांत एकूण ४६ लाख ८९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अत्यंत कठोर असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड किंवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. (FDA Raid)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >