Thursday, August 13, 2026

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर, कार, दुचाकी आणि बसच्या भीषण अपघातात वाडेगव्हाणच्या (ता. पारनेर) सरपंच प्रियंका यादव यांचे पती व उद्योजक किशोर नामदेव यादव (वय 38) आणि दुचाकीस्वार प्रथमेश प्रकाश लाड (वय 30, रा. सुंदर सृष्टी, शिरूर, मूळ रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. (Ahilyanagar News)

भरधाव कंटेनरची कारला धडक, दोघांचा मृत्यू

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर यादव हे कारने शिरूरला आले होते. हॉटेल संग्रामसमोरून यू-टर्न घेत असताना दुभाजकाजवळ प्रथमेश लाड दुचाकीसह थांबले होते. त्यावेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने कारला धडक दिली. कार दुचाकीवर आदळल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या शिवाई बसने कार व दुचाकीला धडक दिली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन किशोर यादव यांचा, तर कार व बसमध्ये चिरडल्याने प्रथमेश लाड यांचा मृत्यू झाला. (Ahilyanagar News)

कंटेनरचालक कंटेनरसह फरार

दरम्यान, कंटेनरचालक कंटेनरसह फरार झाला असून, याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बोल्हेगावात तिरट जुगारावर पोलिसांचा छापा

तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या हारजीतीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सहा मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 56 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना याबाबतची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार, माहितीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पंचांना सोबत घेतले आणि नमूद ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी पोलिसांना पडवीमध्ये सहा जण जुगार खेळताना आढळून आले. (Ahilyanagar News)

त्यांची नावे भाऊसाहेब राफायल बोर्डे (36), जुबेर शौकत पठाण (26), अभिषेक उर्फ पप्पू मोहन देठे (29), दीपक बाळकृष्ण शिरसाठ (34), सुशील काशिनाथ वाव्हळ (30) आणि प्रदीप प्रभाकर कदम (55, सर्व रा. बोल्हेगाव) अशी आहेत. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रकमेसह विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळून आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा