Thursday, August 13, 2026

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्यातील शेंदवड-मोहगावजवळील शिवाऱ्या डोंगरावर झाडाला गळफास घेत प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही रात्री घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता डोंगरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ( Dhule Crime News )

जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह

पल्लवी अभिमान बहिरम (वय १८, रा. वडपाडा-शेंदवड) आणि अरुण जेजिराम चौरे (वय २३, रा. मोहगाव शेंदवड) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर पल्लवी घरात झोपली होती. मात्र, सकाळी ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान अरुणने मध्यरात्री एका व्यक्तीला मेसेज पाठवल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शिवाऱ्या डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना दोघेही गंभीर अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ग्रामीण रुग्णालय, पिंपळनेर येथे दाखल केले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. ( Dhule Crime News )

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती मृत तरुणीचे वडील अभिमन काशीराम बहिरम यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आय.जी.शिरसाठ पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दोघांनी एकाच वेळी जीवन संपविण्याचा निर्णय का घेतला, याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र,या चर्चाना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >