मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या अजरामर गीताची निर्मितीची कहाणी आजही तितकीच भावूक करणारी आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार झालेलं हे गाणं आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागवतं.
- महसूलमंत्र्यांचा निर्णय; नुकसानभरपाई वितरणातील अडचणी आणि सहधारकांमधील वाद कमी होणार मुंबई : सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना ...
या गाण्याच्या जन्माची कहाणीही विलक्षण आहे. प्रसिद्ध कवी प्रदीप १९६२ च्या युद्धातील भारतीय जवानांच्या बलिदानामुळे प्रचंड अस्वस्थ झाले होते. एका संध्याकाळी मुंबईतील माहीमच्या समुद्रकिनारी फिरत असताना त्यांच्या मनात अचानक या गाण्याच्या ओळी सुचल्या. त्या वेळी त्यांच्याकडे कागद किंवा वही नव्हती. त्यामुळे त्यांनी एका अनोळखी व्यक्तीकडून पेन मागितलं आणि सिगारेटच्या पाकिटाच्या फॉइलवर गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी लिहून ठेवल्या, अशी या गीताच्या निर्मितीबाबत प्रसिद्ध असलेली कहाणी आहे.
“ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी...” या ओळी पुढे भारतीयांच्या काळजाला भिडणाऱ्या देशभक्तीच्या गीतात रूपांतरित झाल्या. पण या गाण्याशी जोडलेला आणखी एक रंजक किस्सा म्हणजे लता मंगेशकर यांनी सुरुवातीला हे गाणं गाण्यास नकार दिल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी त्यांचं व्यस्त वेळापत्रक आणि रिहर्सलसाठी उपलब्ध नसलेला वेळ यामुळे त्यांनी गाणं गाण्याबाबत अनिच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आशा भोसले यांचं नावही विचारात घेण्यात आलं.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या ...
मात्र, कवी प्रदीप आणि संगीतकार सी. रामचंद्र यांना हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातच अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास होता. अखेर लतादीदींनी हे गाणं गाण्यास होकार दिला.
२७ जानेवारी १९६३ रोजी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर हे गीत पहिल्यांदा सादर करण्यात आलं. भारत-चीन युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात लतादीदींनी हे गीत सादर केलं. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. गीताचे शब्द ऐकताना नेहरू भावुक झाल्याची आठवण या गाण्याच्या लोकप्रियतेचा महत्त्वाचा भाग बनली. आज अनेक दशकांनंतरही ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे केवळ एक गाणं राहिलेलं नाही; ते शहीद जवानांच्या त्यागाची आणि देशाच्या सामूहिक भावनेची आठवण बनलं आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हे गीत पुन्हा एकदा देशभर घुमेल आणि प्रत्येक भारतीयाला एका गोष्टीची आठवण करून देईल—“जो शहीद हुए हैं, उनकी जरा याद करो कुर्बानी...”






