नाशिक - नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यासह अन्य पाच तालुक्यांना शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, हरसूल, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
याबाबत उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री 10 वाजून 1 मिनिटांनी (22 वाजून 1 मिनिटांनी) भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.८ एवढी नोंद झाली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील भनवड या ठिकाणी असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची मॅग्निट्यूड ४.३, वेळ २२:००:५९ IST, खोली ५ किमी आणि प्रदेश नाशिक, महाराष्ट्र असा तपशील दिला आहे.
प्राथमिक उपलब्ध माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील पेठ, दिंडोरी आणि कळवण या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून, सौम्य भूकंपाचे धक्के चांदवड, देवळा आणि नाशिक तालुक्यात जाणवले आहेत. त्यातही नाशिक शहरातील सिडको, डीजीपी नगर, इंदिरा नगर, बोरगड , म्हसरूळ या भागातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. साधारण 10 वाजून 1 मिनिटांच्या आसपास घरातील भांडी, पंखे, खिडक्या वाजल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन सर्व काळजी घेत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.