Saturday, August 29, 2026

BMC : महापालिका शीव रूग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्या; महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश

BMC : महापालिका शीव रूग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून द्या; महापालिका अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांचे निर्देश

रूग्णालय कर्मचारी उपस्थिती पडताळणीसाठी एआयचा वापर करण्याचेही निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय (शीव) येथे विविध वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वर्दळ असते. विविध आरोग्य सुविधांसाठी पैसे भरण्यासाठी रोख तसेच डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. तसेच, रूग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयात क्षमतावाढ प्रकल्प राबविण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी रूग्णालयास भेट देऊन क्षमतावाढ प्रकल्प कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रूग्णालयातील आपत्कालीन विभाग, विविध कक्ष, एमआयसीयू, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी त्यांनी भेट दिली. या प्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, उपायुक्त (परिमंडळ -२) प्रशांत सपकाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (एफ उत्तर) अरूण क्षीरसागर यांच्या सह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एक्स रे, एमआरआय, बाह्य रुग्ण विभागांचा केस पेपर, वैद्यकीय सेवांचे शुल्क अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवांसाठी रूग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना रोख स्वरूपात पैसे अदा करावे लागतात. त्याठिकाणी डिजिटल पेमेंट करण्यासाठी पॉज मशीन उपलब्ध करून द्यावेत. तसेच डिजिटल पेमेंटसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून रूग्णालयात लागणारी रांग कमी होण्यासाठी मदत होईल. डिजिटल पेमेंटमुळे नागरिक, रूग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना सुलभ पर्याय उपलब्ध होणार असल्याचे लवंगारे यांनी सांगितले.

[caption id="attachment_1049992" align="alignnone" width="650"] Additional Municipal Commissioner Prajakta Verma Lavangare[/caption]

मुख्य रूग्णालय इमारत (टप्पा क्रमांक - २ अ), ऑन्कोलॉजी इमारत आदी ठिकाणी लवंगारे यांनी कामांची पाहणी केली. तसेच प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेतला. नव्याने विकसित होणाऱ्या रूग्णालयात नागरिक तसेच रूग्णालयातील निवासी डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी विरंगुळ्यासाठी ठिकाणे तयार करावीत, असे निर्देश श्रीमती वर्मा लवंगारे यांनी दिले. रूग्णालयात नागरिकांच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच रूग्णालय परिसरात नागरिकांना चालण्यासाठी अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी रूग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी नियमितपणे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रूग्णालयात कार्यरत कर्मचारी वर्गावर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात यावे. जेणेकरून वेळे आधी रूग्णालयातून बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गावर लक्ष ठेवता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मानव संसाधन विभागाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कर्मचारी वर्गाच्या उपस्थिती बाबत निगराणी ठेवण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून पब्लिक एड्रेस सिस्टिमची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. रूग्णालयाच्या ठिकाणी नियमित स्वच्छतेसाठी प्राधान्य देतानाच कर्मचारी वर्गाला विशिष्ट युनिफॉर्म परिधान करण्यासाठी द्यावेत. तसेच रूग्णालयात मूषक व श्वान यांचा उपद्रव राहणार नाही, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. रूग्णालयात हॉस्पिटल मॅनेटजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम यंत्रणेची अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >