Friday, July 31, 2026

Nashik Rain Update : राज्यभरात पावसाचं थैमान ! नाशिकला रेड अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik Rain Update : राज्यभरात पावसाचं थैमान ! नाशिकला रेड अलर्ट, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर येणारे 24 तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे. (Nashik Rain Update)

नाशिकला रेड अलर्ट

हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग केली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2,498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Rain Update)

जळगाव जिल्ह्यात पुराचे पाणी घरात शिरले

जळगाव जिल्ह्यासाठीही आज रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावमध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे जिल्ह्यातील बहुतांश सर्व लहान-मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरी, अंजनीसह अनेक नद्यांना यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरांचे तसेच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Jalgaon Rain Update)

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

हवामान विभागाने विदर्भातील (Vidarbha Rain Marathi News) चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया , जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात 31 जुलैपर्यंत अतिवृष्टी, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची (Vidarbha Rain Marathi News) शक्यता आहे. संभाव्य धोका लक्ष्यत घेता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >