Friday, July 31, 2026

Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर ! पुराचे पाणी घरात शिरले,अनेक गावांचा संपर्क तुटला अन्...

Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर ! पुराचे पाणी घरात शिरले,अनेक गावांचा संपर्क तुटला अन्...

Jalgaon Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यभरात पावसानं धुव्वाधार बॅटिंग केली असून यात अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर येणारे 24 तास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. हवामान विभागाने आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज वर्तवला आहे. जळगावसाठीही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावमध्ये गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Jalgaon Rain Update)

अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरले

जिल्ह्यातील बहुतांश सर्व लहान-मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहू लागल्याने प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बोरी, अंजनीसह अनेक नद्यांना यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरांचे तसेच घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Jalgaon Rain Update)

हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर तापी नदीवरील हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता या धरणाचे चार दरवाजे पूर्णपणे, तर ३२ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले. धरणातून तब्बल १ लाख ८५ हजार ८२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तापी नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Jalgaon Rain Update)

शेतीपिकांचे मोठे नुकसान

दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने याचा फटका पिकांना बसला आहे. अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. काठावरील शेतांमधील कपाशीसह ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन, मका ही पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी उभी पिके आडवी पडली आहेत. पाण्याच्या वेगामुळे सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिल्याने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाकडून महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नदीपात्रात अथवा पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >