Thursday, July 30, 2026

Nashik News : राष्ट्रकुलमध्ये नाशिकच्या सुपुत्राची सुवर्ण झेप; लेकाने 'गोल्ड' जिंकल्याची बातमी शिक्षकांच्या फोनवरून कळली, शाळेत पालकांचा सत्कार

Nashik News : राष्ट्रकुलमध्ये नाशिकच्या सुपुत्राची सुवर्ण झेप; लेकाने 'गोल्ड' जिंकल्याची बातमी शिक्षकांच्या फोनवरून कळली, शाळेत पालकांचा सत्कार

Nashik News : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलेटिक्स संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. या सुवर्णयशात नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील दिलीप महादू गावित (Dilip Mahadu Gavit) याने पुरुषांच्या 100 मीटर टी-47 प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. अवघ्या 10.71 सेकंदांत शर्यत पूर्ण करत दिलीपने राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रमी आणि हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवली. विशेष म्हणजे, देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुलाच्या या यशाची माहिती त्याच्या आई-वडिलांना शिक्षकांच्या फोनवरून मिळाली. त्यांच्याकडे वीज नसल्याने त्यांनी स्पर्धा टीव्हीवरही पाहिली नव्हती. (Commonwealth Games 2026)

चौथ्या स्थानावरून थेट सुवर्णपदक

पुरुषांच्या 100 मीटर टी-47 अंतिम शर्यतीत सुरुवातीला दिलीप चौथ्या स्थानावर होता. मात्र, अखेरच्या काही सेकंदांत त्याने जबरदस्त वेग घेत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि थेट पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याच्या या धावण्याने संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्याच मोहम्मद बासिल (Mohammad Basil) याने 10.83 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. त्यामुळे या प्रकारातील सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके भारताच्या झोळीत पडली. (Commonwealth Games 2026)

सुरगाण्याच्या आदिवासी पाड्यातून जागतिक यश

दिलीप गावित हा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील रहिवासी आहे. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या दिलीपने लहानपणापासूनच धावण्याची आवड जोपासली. अलंगुण येथील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्याने शिक्षण घेतले. शालेय जीवनातच त्याची धावण्याची क्षमता शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्याने अथक परिश्रमाच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. (Commonwealth Games 2026)

'गोल्ड' जिंकल्याची बातमी फोनवरून कळली

दिलीपच्या वडिलांनी मुलाच्या यशाबद्दल भावना व्यक्त करत सांगितले की, दिलीप शाळेत असतानापासून धावतच शाळेत जायचा. त्याच्यात जिद्द होती. गेल्या काही वर्षांपासून तो देशभर प्रशिक्षण घेत होता. तो फक्त एवढेच सांगायचा की मी सुखरूप आहे, काळजी करू नका. त्याचा फोनही अनेकदा लागत नसे. ते पुढे म्हणाले, आज त्याने देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याची माहिती आम्हाला शाळेतील शिक्षकांनी फोन करून दिली. आमच्या घरी वीज नसल्यामुळे आम्ही टीव्हीवर स्पर्धा पाहू शकलो नाही. पण आमच्या मुलाने गाव, शाळा, जिल्हा आणि देशाचे नाव मोठे केले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

शाळेत पालकांचा सत्कार

दिलीपच्या विजयाची माहिती मिळताच सुरगाणा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावकरी, नातेवाईक आणि मित्रांनी गावात जल्लोष केला. दिलीपने शिक्षण घेतलेल्या शहीद भगतसिंग विद्यालयात त्याच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. मुलाच्या यशामुळे भारावून गेलेल्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडूनही अभिनंदन

ऐतिहासिक वेग, ऐतिहासिक गौरव, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीप गावितच्या सुवर्णपदाकाचे कौतुक केले. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या पॅरा 100 मीटर टी-47 प्रकारात अवघ्या 10.71 सेकंदांत दिलीपने विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर 10.83 सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदकही महाराष्ट्राच्याच मोहम्मद बासिल याने पटकावले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष पॅरा-अॅथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारे पहिले खेळाडू ठरलेल्या दिलीप गावित यांनी देशाचा आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असेही फडणवीसांनी ट्विट करुन म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >