प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ बाबा सामाजिक कल्याण क्षेत्रात नोकरीला होते. त्यांचे एम. ए. पर्यंत शिक्षण झालेले होते. त्या काळात मा. प्रतिभा पाटील यांनी त्यांना सामाजिक शास्त्र (Social Science) मध्ये एम. ए. करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शासनातर्फे प्रवेश मिळवून दिला आणि नोकरीत शिक्षणासाठीची रजा मंजूर केली, जेणेकरून त्यांचा पगार व्यवस्थित चालू राहिला. माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही बहिणी तेव्हा तेरा-चौदा वर्षांच्या होतो. बाबांना हॉस्टेलमध्ये राहावे लागायचे त्यामुळे आम्ही अधूनमधून त्यांना भेटायला जायचो. तिथे गेल्यावर आपल्या लाडक्या लेकींना घेऊन बाबा कॅन्टीनमध्ये वगैरे जायचे किंवा त्या प्रांगणाच्या आतमध्ये अतिशय सुंदर असे विस्तीर्ण झाडाभोवती पार केलेले होते त्यावर बसून आम्ही गप्पा करायचो. टाटा इन्स्टिट्यूटच्या आतील हे प्रांगण अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही खूपदा तिथे जात असल्यामुळे जवळजवळ बाबांचे सर्वच वर्गमित्र आमच्या ओळखीचे झाले होते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ही मंडळी आमच्या घरी जेवायला यायची. भारताच्या सर्व भागातून आलेले तसेच परदेशातीलही काही विद्यार्थी तिथे शिकत होते, त्यात अमेरिकन होते तसे आफ्रिकनही होते. त्यांच्याशी आम्ही कसा संवाद साधायचा माहीत नाही पण तासनतास आम्ही मुली त्यांच्याशी गप्पा करायचो. बाबांना शासनातर्फे पाठवलेले असले तरी तिचे असलेले सगळे विद्यार्थी पंचविशीच्या आतले तरुणच होते.
तिथे एक विद्यार्थिनी एका अंध विद्यार्थ्यांचा हात धरून त्याला इकडे तिकडे नेताना आम्ही पाहायचो. कधी कधी त्या प्रांगणात एखाद्या बेंचवर बसून ती त्याला पुस्तकातून काही वाचून दाखवायची. कधी कॅन्टीनमध्येही तो तिच्याबरोबर असायचा, तेव्हा त्याची प्लेट आणणे, त्याच्या हातात चमचा देणे वगैरे ते आनंदाने करायची. सगळ्यांना तिच्या समाजसेवेचे कौतुक वाटायचे. त्यांची परीक्षा झाली आणि त्यानंतर ती विद्यार्थिनी तामिळनाडूमध्ये निघून गेली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर बाबांकडे त्यांचे टाटा इन्स्टिट्यूटमधले मित्र गप्पा मारण्यासाठी आले. त्यांच्या गप्पांमध्ये त्या अंध विद्यार्थ्यांचा विषय निघाला आणि त्यातला कोणीतरी म्हणाला की ती विद्यार्थिनी इथून तामिळनाडूला गेल्यावर त्या अंध विद्यार्थ्याला ना कधी तिने फोन केला ना कधी परत भेटली!
खरंतर या कथेतून आपण अनेक वेगवेगळे अर्थ काढू शकतो. अंतर्गत मार्क मिळवण्यासाठी असे कोणी करत असेल का? हा वाईट विचार आहे पण तोही मनात येऊ शकतोच ना?आणखी एक घटना मला सांगायची आहे, की माझ्याच कॉलेजमध्ये एक अपंग विद्यार्थी होता. त्याची आई त्याला व्हीलचेअरवरून घेऊन यायची; परंतु त्याचा वर्ग दुसरा मजल्यावर होता. कॉलेजमध्ये लिफ्टची सोय नव्हती. तेव्हा काही विद्यार्थी त्याला उचलून पहिल्या मजल्यावर न्यायचे आणि मग त्याची व्हीलचेअर घेऊन यायचे. तिथे त्याला काही वेळ बसवायचे आणि मग परत त्याला उचलून दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायचे आणि मग ती व्हीलचेअर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जायचे. हे दृश्य मी डोळ्यांनी पाहिलेले आहे; परंतु काही दिवसांत मदत करणारे विद्यार्थी कंटाळले. ते पळत पळत आपल्या वर्गाकडे जायचे आणि तो अपंग विद्यार्थी आशाळभूतपणे केवळ अपेक्षा करत राहायचा की कोणीतरी त्याला वर्गात घेऊन जावे. त्याची आई इतकी सशक्त नव्हती, की ती मुलाला उचलून पायऱ्या चढून वर घेऊन जाऊ शकेल! एकदा त्या माऊलीच्या डोळ्यांत मी पाणी पाहिले. धावपळीच्या आयुष्यात एखाद्या माणसाला मदतीचा हात देण्यासाठी खरोखर सगळ्यांकडे वेळ असतो का? आणि वेळ असला तरी मदतीची भावना असते का?
असेच संध्याकाळी फिरायला जाताना मला एक मुलगा अपंगांच्या खुर्चीवरून पुढे सरकताना दिसायचा. त्याच्या त्या खुर्चीला चाके होती. अतिशय हळू; परंतु तो स्वतःच ती खुर्चीची गाडी चालवत समोरून जाताना दिसायचा. तरुण मुलगा होता. एकदा मला त्याच्याशी बोलावेसे वाटले. मी त्याला थांबवले. तो साधारण एक वर्षाचा असताना, आईच्या कडेवरून पहिल्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला कायमचे अपंगत्व आले, ही त्याची कहाणी ऐकून मला प्रचंड वेदना झाल्या. त्याच्या आईला काय वाटत असेल असे वाटून गेले तर तो म्हणाला, “या प्रसंगानंतर आई महिनाभरात हे जग सोडून निघून गेली.” वडिलांनी त्याला वाढवले. त्या क्षणी माझ्या मनात आले, की अशा मुलांची लग्न होत असतील का किंवा लग्नानंतरचे त्यांचे आयुष्य कसे असेल? येता-जाता आम्ही एकमेकांना हाय-हॅलो करायचो. एकदा त्याने ‘मावशी मावशी...’ हाक मारून मला थांबवले आणि म्हणाला, “पुढच्या महिन्यात माझे लग्न आहे. तुम्ही नक्की यायचे!” खरोखरी त्या लग्नाला जायचा योग जुळून आला तेव्हा पाहिले की त्याची पत्नी अपंग नव्हती. सर्वसाधारण आपल्या मनात जे जे येतं ते सगळं माझ्या मनात आलं. पण लग्नानंतर साधारण वर्ष-दीड वर्षांने या मुलाने मला आनंदाची बातमी दिली की तो ‘बाबा’ झाला आहे. हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला.
अपंगांसाठी आजकाल अतिशय चांगला शब्द वापरला जातो तो म्हणजे दिव्यांग! या सर्वांना नेहमीच चांगले आयुष्य मिळतेच असे नाही. कधी भिक्षेसाठी यांचा वापर केला जातो, त्यांच्या नावावर मिळणारे फायदे व अनुदान लुटणारे कोणी वेगळेच असतात, तर कधी कमी वेतनावर त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाते. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन कधीकधी एखादा सुदृढ व्यक्ती, दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणात, बोगस प्रमाणपत्र बनवून स्वतःची वर्णी लावून घेतो. तेव्हा दिव्यांग व्यक्तीकडे आपण नेमक्या कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे, त्यांच्यासाठी नेमके काय केले पाहिजे, त्यांच्या शारीरिक व्यंगाकडे सातत्याने बोट न दाखवता, त्याचा उच्चार न करता त्यांना कसं ‘माणूस’ म्हणून पाहिलं पाहिजे, असा विषय शालेय शिक्षणात असायला हवा असे मला वाटते! pratibha.saraph@ gmail.com






