Thursday, July 23, 2026

‘किंग ऑफ द नॉर्थ’पर्व

‘किंग ऑफ द नॉर्थ’पर्व

ब्रिटनच्या राजकारणात नेतृत्वबदल झाला असून, लेबर पार्टीने अँडी बर्नहॅम यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली आहे. कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वावरील नाराजीनंतर झालेला हा बदल पक्षाच्या नव्या दिशेचा संकेत मानला जात आहे.

दिल्लीत ‘कॉकरॉच पार्टी’च्या गदारोळाची चर्चा सुरू असताना एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे वृत्तपत्रांचे तुलनेने कमी लक्ष गेले. ती घटना म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी अँडी बर्नहॅम यांची झालेली निवड. ५६ वर्षीय अँडी बर्नहॅम हे ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले गेल्या दशकातील सातवे नेते ठरले. ब्रिटनच्या घटनात्मक व्यवस्थेनुसार प्रत्येक वेळी सार्वत्रिक निवडणूक घेऊनच पंतप्रधान बदलण्याची आवश्यकता नसते. सत्ताधारी पक्षाकडे बहुमत कायम असेल, तर पक्षांतर्गत बदलातूनही नवा नेता निवडला जाऊ शकतो. लेबर पार्टीकडे संसदेत बहुमत होते; मात्र पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा पक्षातील संसदीय सहकाऱ्यांचा पाठिंबा हळूहळू कमी होत गेला. पक्षांतर्गत नाराजी वाढल्याने अखेर स्टार्मर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या जागी अँडी बर्नहॅम यांची निवड झाली. मात्र हा केवळ नेतृत्वबदल नव्हता. स्टार्मर यांच्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे लेबर पार्टीचा जनाधार कमी होत असल्याची भावना पक्षातील अनेक नेत्यांमध्ये निर्माण झाली होती. त्यांच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांवर टीका झाली आणि पक्षातील अनेक राजकारण्यांचा त्यांच्यावरील विश्वास डळमळीत झाला. याच पार्श्वभूमीवर अँडी बर्नहॅम यांची निवड ही लेबर पार्टीमध्ये नव्या दिशेचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे. अर्थात, बर्नहॅम यांची पंतप्रधानपदी झालेली निवड ही सहजसाध्य नव्हती. ‘किंग ऑफ द नॉर्थ’ म्हणून ओळखले जाणारे बर्नहॅम हे गेल्या चार वर्षांतील ब्रिटनचे पाचवे पंतप्रधान आहे. मात्र, त्यांच्यासमोर असलेली आव्हाने अत्यंत व्यापक आणि गंभीर आहेत. बर्नहॅम यांच्यासमोरील प्रमुख आव्हान म्हणजे देशाची ठप्प झालेली अर्थव्यवस्था. ‘स्टॅग्नंट इकॉनॉमी’ म्हणजे अशी अवस्था, ज्यामध्ये आर्थिक विकासाचा वेग अत्यंत मंदावतो. अशा परिस्थितीत नवीन रोजगारनिर्मिती कमी होते आणि नागरिकांच्या जीवनमानावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. ब्रिटनमध्ये २००८ पासून सुरू असलेल्या या आर्थिक अडचणींमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. बर्नहॅम यांच्यासमोर अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणे, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे.

ब्रिटनमधील नागरिक वाढत्या करांच्या ओझ्यापासून दिलासा मागत आहेत. त्यामुळे नव्या नेतृत्वासमोर कर धोरण आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचे मोठे आव्हान आहे. सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. उत्पन्नातील वाढती दरी, बाजारपेठांवरील दबाव आणि जीवनमानातील घसरण या समस्या सरकारसमोर उभ्या आहेत. या आव्हानांना बर्नहॅम यांना प्रभावीपणे सामोरे जावे लागेल. नागरिकांचे खालावलेले जीवनमान सुधारायचे आहे, मात्र त्याच वेळी प्रमुख कर वाढवण्याचे टाळण्याचे कठीण संतुलन साधावे लागणार आहे. अमेरिकेच्या भूमिकेचे केवळ अनुकरण न करता पश्चिम आशिया आणि युक्रेन युद्धासारख्या मुद्द्यांवर स्वतंत्र आणि स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. याशिवाय ब्रिटनमधील राजकीय अस्थिरता संपवून देशाला स्थिर सरकार देणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. गेल्या दशकात ब्रिटनने सात पंतप्रधान पाहिले आहेत. त्यामुळे केवळ क्षमायाचना करण्यापेक्षा नागरिकांना सरकारकडून तातडीने आणि ठोस परिणामांची अपेक्षा आहे. सरकारमध्ये विकेंद्रीकरण आणण्याची गरज बर्नहॅम यांनी ओळखली आहे. स्थानिक पातळीवर अधिकारांचे हस्तांतरण आणि प्रशासन अधिक प्रभावी बनवणे हे त्यांच्या पुढील धोरणातील महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. स्टार्मर यांच्या सरकारसमोर जी आव्हाने होती, त्याच प्रकारची आव्हाने बर्नहॅम यांच्यासमोरही आहे. मंद अर्थव्यवस्था, वाढता जीवनावश्यक खर्च आणि ताणलेली सार्वजनिक सेवा व्यवस्था. या सर्व समस्यांवर ठोस उपाय शोधणे आवश्यक आहे. पश्चिम आशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील धोरणात्मक गोंधळ दूर करून स्पष्ट दिशा देणेही त्यांना गरजेचे आहे. ७ कोटी नागरिकांच्या देशाचे नेतृत्व करणे ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. आर्थिक पुनरुज्जीवन, राजकीय स्थैर्य आणि लोकांचा विश्वास परत मिळवणे हेच बर्नहॅम यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.

बर्नहॅम यांच्याकडे आलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था अनेक गंभीर आव्हानांना सामोरी जात आहे. काही काळ वेगाने वाढणारी ब्रिटनची अर्थव्यवस्था आता मंदावण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोविड-१९ महामारीनंतर निर्माण झालेले आर्थिक संकट. या काळात सरकारवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला, ज्याचा परिणाम सार्वजनिक अर्थव्यवस्थेवर झाला. ब्रिटनच्या कल्याणकारी योजनांवरील खर्चातही मोठी वाढ झाली. कामगारवर्गासाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध लाभांवर सरकारला मोठा खर्च करावा लागत आहे. याशिवाय वृद्ध लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे निवृत्तिवेतन आणि आरोग्य सेवांवरील खर्चही वाढला. ब्रिटनमधील नागरिकांचे वाढलेले आयुर्मान हे यामागील एक प्रमुख कारण आहे. या खर्चावर नियंत्रण मिळवणे हे बर्नहॅम यांच्यासमोरील महत्त्वाचे आव्हान असेल. यासोबतच गेल्या काही वर्षांत युरोप आणि इतर भागांतील अस्थिरता, युद्धे, आर्थिक अडचणी, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे अनेक लोकांनी ब्रिटनमध्ये स्थलांतर केले.

स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक रोजगार, सार्वजनिक सेवा आणि सरकारी खर्चावर दबाव वाढल्याची भावना ब्रिटनमधील काही वर्गांमध्ये निर्माण झाली. बर्नहॅम यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटन महत्त्वाच्या राजकीय आणि आर्थिक वळणावर आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक सरकारांना अधिक अधिकार देणे, प्रादेशिक विकासाला चालना देणे आणि सार्वजनिक सेवांची कार्यक्षमता वाढवणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. अमेरिका, जर्मनी आणि भारतासारख्या अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करत आर्थिक विकास, खर्च नियंत्रण आणि नागरिकांवरील भार कमी करणे यावर त्यांना भर द्यावा लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा