Thursday, July 23, 2026

Nashik : दारणा धरणातून पाणी विसर्गात वाढ; 19 हजार 312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : दारणा धरणातून पाणी विसर्गात वाढ; 19 हजार 312 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दारणा धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. नाशिक पाटबंधारे विभागाने गुरुवारी (23 जुलै) सायंकाळी 7 वाजल्यापासून धरणातून 19 हजार 312 क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वी धरणातून 15 हजार 498 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सायंकाळी 7 वाजल्यापासून विसर्गात 3 हजार 814 क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास किंवा वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारणा नदीपात्र आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.

नदीपात्रात असलेले साहित्य, जनावरे तसेच इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे. दरम्यान, संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गंगापूर धरणातून विसर्गात वाढ

सोबतच गंगापूर धरणातून 13,932 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >