Thursday, June 25, 2026

जनसंवाद

जनसंवाद

राजकीय हताशतेचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख पद सोडण्याची केलेली घोषणा, हा त्यांच्या राजकीय हताशतेचा कळस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पक्षातच मोठी खदखद निर्माण झाली आहे. आपल्या नेतृत्वाची पकड ढिली होत असताना आणि कार्यकर्ते दुरावत असताना, सहानुभूती मिळवण्यासाठी हा 'राजीनाम्याचा' जुना आणि घासून गुळगुळीत झालेला डाव खेळला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली ती प्रखर विचार, अथक संघर्ष आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर. मात्र, आजच्या नेतृत्वाकडे या तिन्ही गोष्टींचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. राजकारणात भावनिक आवाहनांना काही काळ थारा मिळू शकतो, पण जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विचारांशी प्रामाणिक राहणे आणि संकटाच्या काळात कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे आवश्यक असते. उबाठा गटाकडे आज ना विचारांचा वारसा उरला आहे, ना कार्यकर्त्यांचे बळ. त्यांचा हा राजीनाम्याचा इशारा म्हणजे पराभूत नेतृत्वाचा असाहाय्य आक्रोश आहे. जोपर्यंत हे नेतृत्व आत्मपरीक्षण करत नाही, तोपर्यंत केवळ भावनिक साद घालून त्यांना गमावलेले जनसमर्थन परत मिळणार नाही. - राजू जाधव, मांगूर, बेळगांव तरुणाईमधील नैतिक मूल्यांचा ऱ्हास पुण्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्याकांडासारख्या घटना आजच्या तरुण पिढीतील क्रूर मानसिक विकृतीचे भयावह दर्शन घडवत आहेत. आयुष्याचा जोडीदार आवडला नाही किंवा नातेसंबंधात अडथळे निर्माण झाले, तर कायद्याचा किंवा संवादाचा मार्ग निवडण्याऐवजी थेट हत्येचा थंड डोक्याने कट रचणे, हे नैतिकतेच्या रसाळाचे लक्षण आहे. आजच्या तरुणाईमध्ये क्षणिक सुख आणि भौतिक संपत्तीच्या लोभापायी सद्सद्विवेक बुद्धीचा पूर्णपणे विसर पडत चालला आहे. सायकोपॅथिक प्रवृत्ती बळावत असल्याने, दुसऱ्याच्या जीवाचे मोल या मंडळींना उरलेले नाही. राग आणि वासना इतक्या तीव्र झाल्या आहेत की, त्यांना हिंसक मार्गाची भीती वाटत नाही. समाजात कायद्याचा धाक उरलेला नाही, हेच या वाढत्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ कडक कायद्याची अंमलबजावणी करून चालणार नाही, तर कौटुंबिक संस्कारांची आणि नैतिक मूल्यांची पुनर्बांधणी करणे काळाची गरज आहे. नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि गुन्हेगारांना जलद गतीने कठोर शिक्षा मिळणे, हेच अशा विकृतींना आळा घालण्याचे प्रभावी उपाय ठरू शकतात.- प्रदीप अनुसया शंकर मोरे, अंधेरी धरणे भरली तरी समस्या संपत नाही पुणे शहरातील भीषण पाणीटंचाई ही केवळ पावसाच्या कमतरतेची समस्या नाही, तर ती अनियंत्रित शहरीकरणाचे फळ आहे. आजही नागरिक घर घेताना केवळ ईएमआय आणि आधुनिक सुविधांचा विचार करतात, परंतु त्या भागातील भूजलसाठा, भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि पाणीपुरवठ्याची क्षमता यांचा विचार पूर्णपणे दुर्लक्षित केला जातो. टँकरवर अवलंबून राहणे हा कायमस्वरूपी उपाय नसून, तो केवळ तात्पुरता दिलासा आहे. कारण टँकरचे पाणीही शेवटी भूगर्भातील साठ्यातूनच उपसले जाते, ज्याला स्वतःच्या मर्यादा आहेत. धरणे भरली की पाणी टंचाईची समस्या संपली, अशी भ्रामक समजूत बाळगणे हे आत्मघातकी आहे. नैसर्गिक संसाधने मर्यादित असताना वाढती बांधकामे संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण करत आहेत. भविष्यातील २० ते ३० वर्षांचा विचार करून शाश्वत विकासाचे नियोजन करणे आता अनिवार्य आहे. केवळ स्वप्नातील घराचे क्षेत्रफळ पाहून गुंतवणूक करणाऱ्यांनी, 'पाणी कुठून येणार?' हा प्रश्न प्राधान्याने विचारला पाहिजे.- अनिकेत शेटे, पुणे "बदलती कुटुंबसंस्था जून महिन्यातील तिसरा रविवार 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जातो. कुटुंबात आई-वडिलांना मिळणारा सन्मान हा आपली कुटुंबसंस्था कोणत्या दिशेला चालली आहे, याचे दर्शक असतो. जुन्या काळी एकत्र कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल आदरयुक्त भीती असे, मात्र आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांचे वडिलांशी मैत्रीचे नाते अधिक दिसून येते. ही बदलती संस्कृती सकारात्मक असली तरी, अनेकदा हे प्रेम केवळ सोयीपुरते तर नाही ना, असा प्रश्न पडतो. आई-वडील नोकरी करत असल्यामुळे कौटुंबिक वातावरणात बदल झाला आहे, तरीही वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे. सासरी गेलेल्या मुली आपल्या वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी उचलत असल्याचे चित्र दिसत असले तरी, अनेक ठिकाणी वृद्धांना वाऱ्यावर सोडले जात आहे. 'फादर्स डे' सारखे दिवस साजरे करणे नक्कीच स्वागतार्ह आहे, परंतु ते केवळ एक दिवसाचे सोपस्कार न राहता त्यामागील पितृत्वाचा आदर आणि कृतज्ञतेचा विचार वर्षभर जपला गेला पाहिजे.- प्रफुल्लचंद्र काळे, सातपूर नाशिक भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख 'कोहिनूर' श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ ११ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ठोकलेले अर्धशतक हे त्याच्या अफाट प्रतिभेचे उत्तम उदाहरण आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील १७१ धावांची खेळी असो किंवा नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील आक्रमक फलंदाजी, वैभवची बिनधास्त खेळण्याची शैली प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी काळ ठरत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने तीन वेळा नव्वदी पार केली, तर अलीकडच्या एका सामन्यात केवळ २९ चेंडूंत ९४ धावांचा तडाखा दिला. वैभवच्या खेळात भीतीचा लवलेशही नाही, मात्र शतकाचा टप्पा गाठण्याऐवजी तो आक्रमकतेच्या नादात लवकर बाद होतो, हे त्याच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे. पण भारतीय क्रिकेटला वैभव सूर्यवंशीच्या रूपाने एक अस्सल 'कोहिनूर' नक्कीच गवसला आहे.- हेमंतकुमार मेस्त्री, मनोर

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा