Tuesday, June 23, 2026

BMC: सो व्हॉट? महापालिका अधिकाऱ्याचा अरेरावीपणा

BMC: सो व्हॉट? महापालिका अधिकाऱ्याचा अरेरावीपणा

लोकप्रतिनिधीच्या अवमान प्रकरणी महापालिका राजशिष्टाचार अधिकारी यांच्या विधी समितीत निलंबनाचा ठराव

मुंबई (विशेष प्रतिनिध):

मुंबई पब्लिक स्कूल (लिबर्टी गार्डन) उद्घाटन कार्यक्रमातील कथित प्रोटोकॉल उल्लंघनाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) विधी समितीच्या बैठकीत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेनंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्यस्थिती समोर येईपर्यंत राजशिष्टाचार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा ठराव विधी समितीने एकमताने मंजूर करण्यात आला.

विधी व महसूल समितीच्या बैठकीत

तेजिंदर सिंग तिवाना यांनी उद्घाटन कार्यक्रमातील राजशिष्टाचाराचे उल्लंघन, स्थानिक लोकप्रतिनिधीचा अवमान, उद्घाटनाच्या कोनशिलेवरून स्थानिक नगरसेवकाचे नाव वगळणे बाबत विचारणा केली असता, "सो व्हॉट?" असे मुजोर उत्तर देत महापालिका राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांनी अरेरावी केली. याबाबत विधी समितीच्या बैठकीत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी महापालिका राजशिष्टाचार विभागाच्या भूमिकेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. राजशिष्टाचार अधिकाऱ्यांना आधी शिष्टाचार शिकविण्याची गरज आहे असे खडे बोल प्रशासनाला सुनावले.

यावेळी तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले की, "हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नसून लोकशाही संस्थांचा सन्मान, स्थानिक लोकप्रतिनिधींचे अधिकार आणि महानगरपालिका प्रशासनाच्या निष्पक्षतेचा आहे. चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे."

मुजोर अधिकारी निलंबित

चर्चेनंतर विधी समितीने चौकशी प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी आणि कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू नये, या उद्देशाने राजशिष्टाचार अधिकारी संदीप लाळगे यांना चौकशी पूर्ण होऊन अहवाल प्राप्त होईपर्यंत निलंबित करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा