Sunday, June 21, 2026

MP Omraje Nimbalkar : मी शिवसेनेत प्रवेश करणार - ओमराजे निंबाळकर

MP Omraje Nimbalkar : मी शिवसेनेत प्रवेश करणार - ओमराजे निंबाळकर

मुंबई : "धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मी आज सविस्तर चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश आले असले, तरी आम्ही जनतेची कामे करण्यात कधीही कमी पडलो नाही. मात्र, सध्या सत्तेत असल्याशिवाय लोकांची विकासकामे मार्गी लावण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही आज अंतिम निर्णय घेतला असून, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे," अशी अधिकृत घोषणा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून ओमराजेंच्या 'तळ्यात-मळ्यात' भूमिकेमुळे उबाठा गटाच्या गोटात आशा निर्माण झाली होती, तर शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर' संकटात सापडल्याची चर्चा होती. मात्र, रविवारी ओमराजेंनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केल्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. रविवारी सकाळी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली, त्यानंतर हा निर्णय जाहीर केला.

कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर कौतुक केले. ते म्हणाले, "नुकत्याच लागलेल्या निकालांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आमची दखल घेतली. त्यामुळे मतदारसंघातील कामांसाठी आता आपल्याला हा मोठा निर्णय घ्यावाच लागेल. मला गेल्या दोन दिवसांत अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, काहींनी नाव खराब होत असल्याचा सूर लावला. मात्र, सत्ता नसल्यामुळे आपल्या अनेक विकासकामांमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील वाढती राजकीय आव्हाने आणि निधीसाठी करावी लागणारी कसरत पाहता, मतदारसंघात टिकून राहण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसोबत जाणे अनिवार्य आहे. शेवटी आपल्यालासुद्धा राजकीयदृष्ट्या जिवंत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मी जो काही निर्णय घेतला आहे, त्यात तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी ठामपणे राहावे."

........

आमदार राणाजगजीतसिंह यांच्या वाढत्या प्रस्थामुळे निर्णय?

- धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वाढत चाललेले राजकीय प्रस्थ आणि दुसरीकडे सत्ता नसल्यामुळे उबाठा गटाच्या आमदारांना व खासदारांना निधी मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत, या पार्श्वभूमीवर ओमराजेंनी सत्तेत जाण्याचा मार्ग निवडला आहे. या संपूर्ण 'ऑपरेशन टायगर'मध्ये ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेत आणण्याची मुख्य जबाबदारी माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली होती.

- रविवारी स्वतः तानाजी सावंत हे ओमराजेंच्या भेटीसाठी धाराशिवमध्ये दाखल झाले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सावंत यांनी 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचा दुजोरा दिला. "पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल नुकताच लागला आहे. माझे ओमराजे यांच्याशी जुने कौटुंबिक संबंध असल्याने, मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आणि पुढील नियोजनासाठी येथे आलो आहे," असे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. ओमराजेंच्या या निर्णयामुळे उबाठा गटातील बंडखोर ६ खासदारांच्या शिवसेनेत जाण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >