Friday, August 21, 2026

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक निश्चित केले आहे. त्रिसा आणि गायत्री यांनी उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जिया यी फान आणि झांग शू जियान यांच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचताच खेळाडूंचे पदक निश्चित होते.

त्रिसा-गायत्री या जोडीने जिया आणि झांग यांच्या जोडीचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव केला. त्रिसा आणि गायत्रीची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला दुहेरी जोडीने पदक निश्चित केले आहे. यापूर्वी 2011 मध्ये लंडन येथे झालेल्या या स्पर्धेत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्यपदक पटकावले होते. भारताची बिगरमानांकित जोडी सुरुवातीला पिछाडीवर होती. मात्र, दमदार पुनरागमन करत त्रिसा आणि गायत्री यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या त्रिसाने या सामन्यात शानदार कामगिरी केली. भारतीय जोडीने पहिला गेम गमावला होता; मात्र त्यानंतर जोरदार खेळ करत सामन्यात पुनरागमन केले आणि भारतासाठी पदक निश्चित केले.

त्रिसा आणि गायत्री या जोडीने 2022 आणि 2023 मध्ये ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तसेच, 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक जिंकले होते. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला ही जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्येही पोहोचली होती. यंदाच्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आणि उबर कपच्या तयारीदरम्यान त्रिसाच्या घोट्याला दुखापत झाली होती. सराव करताना तिचा पाय जोडीदाराच्या पायावर पडल्याने तिचा घोटा मुरगळला. त्यानंतर तिची एमआरआय तपासणी करण्यात आली आणि दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. पुनर्वसनानंतर त्रिसा आणि गायत्री यांनी इंडोनेशिया ओपनमधून पुनरागमन केले. त्यानंतर फिलिपिन्स इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी यूएस ओपनमध्येही भाग घेतला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >