Wednesday, June 17, 2026

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मलजलावर प्राथमिक , दुय्यम तसेच तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्यात येणार आहे. तृतीय स्तरीय प्रक्रियेमुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता अधिक उंचावणार असून, हे पाणी औद्योगिक वापर, उद्यानांचे सिंचन, सार्वजनिक स्वच्छता, बांधकाम क्षेत्र तसेच इतर बिगर पेयजल गरजांसाठी पुनर्वापर करता येणार आहे. यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
`मुंबईतील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एकूण ७ ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहेत. या अंतर्गत भांडुप येथे मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. या अंतर्गत पूर्वप्रक्रिया एकक , प्राथमिक गाळ स्थिरीकरण टाक्या , अनुक्रमिक जैविक अभिक्रिया टाकी, वायू पुरवठा यंत्र गृह आणि गाळ पचन टाक्या आदींची स्‍थापत्‍य कामे पूर्ण झाली आहेत. सर्व कामांची पाहणी करत आश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती घेतली.
भांडुप येथील २१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी बुधवारी १७ जून २०२६ रोजी या कामाची पाहणी केली. ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित करावा, असे निर्देश भिडे यांनी दिले.
महानगरपालिका आयुक्त अाश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की, भांडुप येथे उभारण्यात येत असलेले २१५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे अत्याधुनिक मलजल प्रक्रिया केंद्र मुंबई महानगराच्या पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मलजलावर प्राथमिक , दुय्यम तसेच तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्यात येणार आहे. तृतीय स्तरीय प्रक्रियेमुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता अधिक उंचावणार असून, हे पाणी औद्योगिक वापर, उद्यानांचे सिंचन, सार्वजनिक स्वच्छता, बांधकाम क्षेत्र तसेच इतर बिगर पेयजल गरजांसाठी पुनर्वापर करता येणार आहे. यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या गाळावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया केलेल्या मलजलाचे सुरक्षित व्यवस्थापन झाल्यामुळे परिसरातील जलस्रोतांमधील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ आणि शाश्वत मुंबई’ या उद्दिष्टाला बळकटी देणारा हा प्रकल्प सांडपाणी व्यवस्थापनाची क्षमता वाढविण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्य संरक्षण आणि जलस्रोतांचे दीर्घकालीन व्यवस्थापन यामध्येही महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा