महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही
विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर नाराजी
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागमधील बंगल्यावर अडीच कोटींचा खर्च झाल्यावर आता पुन्हा एकदा बंगल्यासह परिसरातील कामांवर आणखीन दोन कोटी रुपयांचा खर्च करण्याबाबतची निविदा काढण्यात आली होती. यावर माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्यानंतर आणि सर्वत्र टीकेचा सूर उमटल्यानंतर अखेर याबाबतची निविदाच रद्द करण्यात आली आहे. याबाबतची निविदा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश महापौरांनी दिल्यानंतर प्रशासनाच्यावतीने ही निविदा रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, या खर्चाबाबत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने "वायफळ खर्च नको" अशी भूमिका व्यक्त करत महापौरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता.
महापौर बंगल्याची आतील कामे ही पालिका प्रशासनाकडून पार पाडण्यात आलेली आहेत. सध्या बंगल्याच्या कामाशी नवीन कामांचा काहीच संबंध नाही. महापौरांनी कोणतीही नवीन कामांची सूचना केलेली नाही. नवीन कामे ही राणी बागेची आजूबाजूची संबंधित कामे कसून त्याची निविदा प्रक्रिया प्रशासनाकडून परस्पर करण्यात आलेली आहेत, असे स्पष्टीकरण देत महापौर रितू तावडे यांनी दिले आहे. संबंधित नवीन कामांची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी सूचना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी महापौर रितू तावडे यांना केली. मात्र त्याची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी, ही टेंडर प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला देत ' न रहेगा बास न रहेगी बासरी ', अशी कातडीबचाव भूमिका घेतली असल्याचे दिसून येते.
मुंबईकरांच्या मूलभूत नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महापौर रितू तावडे या नोकरचाकर, मोटारगाडी आणि बंगल्याच्या सुविधांमध्येच गुरफटल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. महापौरपदाची अक्षरशः थट्टा होत असल्याची भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे असल्याचे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
जनतेच्या पैशाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या सुखसोयींसाठी नव्हे. मुंबईकरांच्या पैशाचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे, हीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे, असे सांगत काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी महापौरांवर टीकास्त्र सोडले.
तर आम्ही सल्ला देण्याच्या भूमिकेत नाही, तर मुंबईकरांच्या पैशांची बचत करण्याच्या भूमिकेत आहोत. प्रशासकीय कामांबाबत अधिकारी किंवा प्रशासनाचा प्रस्ताव असेल, तर त्यामध्येही बचत झाली पाहिजे. त्यामुळे हे टेंडर रद्द करण्यात यावे. मात्र ही निविदा का काढली आणि कोणाच्या सांगण्यावरून काढली ? याची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी व्यक्त केली. मुंबईकरांसाठी जे करता येईल ते करावे. मुंबईकरांच्या विकासकामांवर भर द्यावा, असा मित्रत्वाचा सल्लाही अमेय घोले यांनी दिला.






