Thursday, August 6, 2026

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश

मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कृषी निविष्ठा वाटपात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्याप्रकरणी १५ कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (२०२५-२०२६) एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या योजनांच्या अंमलबजावणीसाठी धाराशिव जिल्ह्यात सुमारे २४ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेत प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीला डावलून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तपासादरम्यान मृत शेतकरी तसेच कागदोपत्री बनावट लाभार्थी तयार करून कोट्यवधी रुपयांच्या निविष्ठा कागदावरच वाटल्याचे दाखवण्यात आल्याचे समोर आले.

या घोटाळ्याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित करण्यात आलेल्या १५ अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रशासकीय अनियमिततेसोबतच आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी केली जाणार आहे. राज्यभरातील कृषी यंत्रणेला इशारा

शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला आहे. या चौकशीत आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदारांचे लागेबांधे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, चौकशी अंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भरणे यांच्याकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >