Sunday, June 14, 2026

Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

Mohan Bhagvat : आपण हिटलर नाही, संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत

दत्तात्रेय होसबळेंच्या विधानाला मोहन भागवत यांचे समर्थन

तिरुवनंतपुरम : पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवली पाहिजेत," या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस (सरकार्यवाह) दत्तात्रेय होसबळे यांच्या विधानाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर समर्थन केले आहे. "होसबळे यांच्या विधानाचा संदर्भ शेजारील देशाच्या (पाकिस्तानच्या) सरकारशी नसून, तिथल्या सामान्य जनतेशी होता," असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण भागवत यांनी दिले. तिरुवनंतपुरम येथे संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित एका विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मे महिन्यात दत्तात्रेय होसबळे यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ घेत जेव्हा संघाच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही देशाबाबत संघाचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नसते; संघ नेहमी केंद्र सरकारच्या भूमिकेचे आणि धोरणांचे पालन करतो.

परंतु, पाकिस्तानमधील समाजाचा उल्लेख करताना सरसंघचालक म्हणाले की, आजही पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाटते की भारताची फाळणी ही एक मोठी चूक होती. तिथले अनेक पत्रकारही संघाचे आणि त्याच्या कार्याचे कौतुक करतात. पाकिस्तानात एक मोठा गट असा आहे जो त्या देशाच्या मूळ विचारसरणीला आणि 'द्वि-राष्ट्र सिद्धांता'ला तीव्र विरोध करतो. आपण एकत्र राहिलो असतो तर ते दोन्ही देशांसाठी अधिक चांगले झाले असते, अशी भावना तिथल्या लोकांमध्ये आहे."

भविष्यातील संभाव्य परिस्थितीवर भाष्य करताना मोहन भागवत यांनी जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जर भारताने भविष्यात पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव केला, तर तिथल्या लोकांच्या बाबतीत केवळ दोनच पर्याय उरतील, एकतर त्यांना भारतात सामावून घेणे किंवा असे वातावरण निर्माण करणे जिथे ते स्वतःच्या देशात शांततेने राहू शकतील. ते पुढे म्हणाले, "या दोन्ही परिस्थितींचा विचार करता संवादाची दारे खुली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण हिटलरसारखे क्रूर नाही आहोत; तो आपला स्वभावही नाही आणि आपला मार्गही नाही. त्यामुळे आपण काही मार्ग नेहमी खुले ठेवले पाहिजेत. आपण अन्याय आणि दडपशाही पूर्णपणे नष्ट केली पाहिजे, परंतु जे काही चांगले आहे त्याचे जतन करणे हे देखील आपले कर्तव्य आहे."

यापूर्वी मे महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत, "भारताने पाकिस्तान आणि त्या देशाकडून प्रायोजित केल्या जाणाऱ्या दहशतवादाचा सामना कसा करावा?" असा प्रश्न होसबळे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना होसबळे म्हणाले होते, "कोणत्याही देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान हे सर्वात आधी आणि सर्वोपरि असले पाहिजे आणि सध्याच्या सरकारने याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. मात्र, त्याच वेळी आपण संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत; संवादासाठी आपण नेहमीच तयार राहिले पाहिजे." नेमक्या याच भूमिकेचे आता सरसंघचालकांनी समर्थन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा