Sunday, June 14, 2026

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सावंतवाडीकरांना दिलेला शहराच्या विकासाचा शब्द आम्ही पूर्ण करत असून, विरोधकांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि आपली 'रेघ' मोठी करून कामे पूर्ण करा, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यानंतर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेतील २७ सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, उपाध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्याधिकारी विनायक औंधकर, लखमराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

या ऐतिहासिक निर्णयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते म्हणाले, नगर परिषद निवडणूकीत खासदार नारायण राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शहराचा जुना विकासाचा बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे. यामध्ये माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांचे योगदान मोठे आहे. सध्या नगरपरिषदेमध्ये काम करण्याची प्रचंड तळमळ असणारे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक लाभले आहेत. त्यामुळे शहरासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विकास करायचा आहे. लोकोपयोगी विकासकामांचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. ही कामे केवळ पायाभूत सुविधा उभारणारी नसून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारी आहे. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नगरपरिषदेने चांगला विकास आराखडा तयार केला. त्यामुळे सावंतवाडी पर्यटनाच्या दृष्टीने अधिक वेगाने विकसित होईल, असा विश्वास आहे. ते पुढे म्हणाले, आज सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देताना त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटते. जिल्ह्यात अधिकाधिक चांगले प्रकल्प आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. गुजरात मधील 'वनतारा' प्रकल्प आणि तेथील विकास पाहून एक भारतीय म्हणून अभिमान वाटतो. केवळ गुजरातचे कौतुक करत न बसता आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावात असा जागतिक दर्जाचा प्रकल्प कसा उभारता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. जगातील लोकांना आपल्या सावंतवाडीचा हेवा वाटेल असे काम करून मतदारांनी दिलेल्या विश्वासाला व मताला आम्ही पूर्ण न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना ते म्हणाले की, विकासकामे लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा निधीचे दरवाजे बंद होतील. मतदारांच्या आशीर्वादामुळे सावंतवाडीला आदर्श शहर बनवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. 'सिंधुरत्न' योजनेसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून कामे वेळेत पूर्ण करा आणि पुढच्या निधीची अपेक्षा ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेतही मोठी सुधारणा होणार आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. तर नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे तसेच अनेक विकासकामांचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले की, आज नियुक्तीपत्र प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी प्रास्ताविकातून नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा