Thursday, June 11, 2026

चिंता करितो विश्वाची!

चिंता करितो विश्वाची!

भारतीय संत - डॉ. अनुराधा कुलकर्णी

 

एकांतात पद्मासन घालून, चिंतनमग्न होऊन, बसलेल्या किशोरवयीन नारायणाला पाहून त्याच्या आईने, ‘काय करतोस?’ म्हणून नवलाने विचारले. तेव्हा “आई, चिंता करितो विश्वाची!” असे नारायणाने उत्तर दिले. त्यावेळी ‘नारायण सूर्याजी ठोसर’ या समर्थ व्यक्तित्त्वाच्या विश्वात्मकतेची मुहूर्तमेढ झालेली होती. वैयक्तिक प्रपंचाकडे पाठ फिरवून विश्वाचा प्रपंच साधण्यासाठी समर्थांनी आपल्या लग्नमंडपातून पलायन केले. प्रभू रामचंद्रांनाच सद्गुरू मानून नाशिक जवळील टाकळी या गावी बारा वर्षे तपश्चर्या केली. सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे अत्यंत सखोल अध्ययन केले. त्याचबरोबर तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती, रूढी, परंपरा, मंदिर, मठांच्या रचना, वनौषधी इ. अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. साधनेतील शरीर माध्यमांचे महत्त्व जाणून बलोपासनाही केली. प्रभू रामचंद्रांच्या साक्षात्कारासाठी तीव्र तळमळ लागलेल्या समर्थांनी अनन्य भक्तीने रामाची करुणा भाकली. आपले सर्वस्व श्रीरामाला वाहून ते ‘रामदास’ झाले! शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक क्षेत्रांत परिपूर्णत्व पावलेले रामदास स्वामी पर्यटनास निघाले. नाना देश, तीर्थक्षेत्रे, पंथ, लोक पाहता-पाहता ते हिमालयात पोहोचले. हिमालयाचे भव्य, दिव्य रूप पाहून येथेच आपला नश्वर देह टाकून द्यावा, अशी समर्थांना उर्मी आली.

म्हणोनि हिमालय कुंडी समर्थ बुडी देती । रघुनाथजी समर्थासी वरिच्या वरि धरिती ।। तुमची तनु ते आमुची तनु आहे । दोन्ही तपे तुमची रक्षिली काया हे । धर्मस्थापने कारणे ।। आत्मारामाने समर्थांना आपल्या जीवनकार्याचे स्मरण करून दिले. अस्मानी सुलतानीच्या झंझावातात दिशाहीन झालेल्या समाजाला सावरण्यासाठी सर्वार्थाने समर्थ व्हायला हवे. याची तीव्र जाण रामदास स्वामींना आली. देवालयांचा विध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार, निरपराध्यांची कत्तल हे सर्व पाहून समर्थ हृदय विदीर्ण झाले. ‘परचक्र निरूपण’ या आपल्या स्फुटात ते म्हणतात, पदार्थ मात्र तितुका गेला। नुस्ता देशचि उरला । येणे करिता बहुताला । संकट जाले । लोके स्थान भ्रष्ट जाली । कितेक तेथचि मेली । उरली ती मराया आळी । गावावरी ।।

परचक्राला समर्थपणे तोंड देण्यासाठी समाजाला आत्मभान देणारा नेता निर्माण व्हायला हवा. नैराश्यवादी, प्रारब्धवादी झालेल्या समाजासमोर बलदंड कर्मयोगी हनुमंताचा आदर्श उभा करण्यासाठी, शक्तीच्या उपासनेसाठी समर्थांनी अकरा मारूतींची स्थापना केली. चाफळला राममंदिर बांधले. कीर्तन-प्रवचनाद्वारे लोकांना नेटक्या प्रपंचाचा व परमार्थाचा अखंड बोध केला. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि इतर बहुसंख्य पदे, प्रकरणे अशा समृद्ध वाङ्मयातून समर्थांनी उत्कृष्टपणे लोकशिक्षण साधले. त्यांच्या दासबोध ग्रंथात जशी आध्यात्मिक शिकवण आहे, तशीच व्यावहारिकही शिकवण अगदी सोप्या मार्मिक भाषेत आहे, लोक कल्याणासाठी लोक संघटन आवश्यक आहे, हे जाणून समर्थांनी रामदासी निर्माण केला. ठिकठिकाणी मठ स्थापून त्यांची निःस्पृहपणे चोख व्यवस्था पाहणारे महंत तयार केले. समर्थांचे मठ व मंदिरे ही हिंदूंची संघटन केंद्रे होती. या केंद्रात बलाची उपासनाही घडत असे. शक्तिशाली आणि सुविचारी युवकांची ही संघटना स्वधर्म व स्वराज्याच्या मंदिराचा पायाच ठरत होती. समर्थांनी आपल्या तपःश्चर्येच्या बलाने प्रेताला जिवतं केले. यापेक्षाही अधिक समर्थ चमत्कार म्हणजे मृतप्रय झालेल्या राष्ट्राला स्वसामर्थ्याची जाणीव करून देऊन जिवंत केले. हा होय. त्यांच्या

“जय जय रघुवीर समर्थ’’ या गर्जनेने महाराष्ट्रात चैतन्य फुलले. समर्थांनी स्वतः डोंगरदऱ्यात, घळीत राहून समाजाच्या, देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समर्थांच्या विचारधनाचा आवाका थक्क करणारा आहे. विटांची भट्टी कशी भाजावी किंवा बागकाम कसे करावे, कारखान्यातील काम कसे करावे इ. प्रकरणांपासून कुटुंब नियोजनाच्या आवश्यकतेपर्यंत त्यांचे मौलिक लेखन आहे. लेकुरे उदंड जाली । तो लक्षी निघोन गेली ।। त्याचप्रमाणे बचत कशी करावी, सामान्य जनतेशी कसे वागावे, अशा विवेचनापासून माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, याचेही विवरण समर्थ अत्यंत समर्थपणे करतात. त्याचबरोबर निष्क्रियतेचा ते निक्षून निषेध करतात. निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार करतात.

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।। कष्टेविन फल नाही । कष्टेविण राज्य नाही ।। अशा रीतीने अखंड प्रयत्नवादाची शिकवण समर्थांनी दिली. संत अक्काबाई, संत वेणाबाई, अंबिकाबाई या विधवा स्त्रियांना संप्रदायात घेऊन, त्यांची वैचारिक, आध्यात्मिक बैठक पक्की करून त्यांना मठपतीसारख्या मानाच्या जागा दिल्या. स्त्रीविषयक समान दृष्टिकोन प्रकट केला. सामाजिक समतेचाही धडा समर्थांनी दिला आहे. भेटो कोणी नर । धेड महार चांभार । त्याचे राखावे अंतर । या नाव भजन ।। कोणीही व्यक्तीने स्वतः कष्ट सोसून, सर्व चांगल्या गोष्टी मिळवून त्याचा विनियोग मात्र समाजासाठी करावा, असे समर्थांचे सांगणे आहे. समर्थ रामदास आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते दीप आणि प्रभा, पुष्प आणि सुगंध यासारखे म्हणता येईल. कारण समर्थ हृदयातले सर्व साक्षेपी विचार शिवरायांच्या रूपाने मूर्त झालेले दिसतात.

श्री समर्थांची शिवछत्रपतींना उद्देशून लिहिलेली पद - निश्चयाचा महामेरू । बहूत जनासी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। परोपकाराचिया रासी । उदंड घडती जयासी । त्याचा गुण महत्त्वासी । तुळणा कैची ।। नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती पुरंदर आणि आदिशक्ती । पुष्टीभागी ।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।। कितेक दुष्ट संहारिला । कितेकासी धाक सुटला । कितेकासी आश्रयो जाला । शिवकल्याण राजा ।।

“मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ” हे जे समर्थांच्या अंतःकरणात तीव्र आर्त होते तसेच त्यांचे “आनंदवनभुवना ’’चे जे स्वप्न त्यांच्या अखंड डोळ्यांसमोर होते, ते साकार करणारे शिवाजीराजे पाहून समर्थ हृदयाला केवढा आनंद झाला असेल! शिवरायांचा यथोचित गौरव करून समर्थांनी त्यांना राजधर्म, क्षात्रधर्म, तसेच अखंड सावधानता यांचा उपदेश केला आहे. अमर्याद फितवेखोर । त्यांचा करावा संहार ।। नजर करारी राखणे । कार्य पाहून खतलकरणे इशारतीचे बोलो नये । बोलायचे लिहो नये । लिहायचे सांगो नये । जबाबीने ।।

शिवरायांनी समर्थपदी अढळ निष्ठा ठेवली. या दोन लोकोत्तर पुरुषांचे नाते म्हणजे महाराष्ट्राच्या सुभाग्याची ललाट रेषा होय. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी हे भाग्य परमोच्च बिंदुला पोहोचले होते. शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।।

इ.स.१६८० मध्ये महाराजांनी देह ठेवला तेव्हा समर्थांचे विरागी मनही विलक्षण गलबलून गेले ! शंभुराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ म्हणतात, शिवराजासी आठवावे । जीवित्व तृणसमान करावे । येहलोक परलोकी तरावे । कीर्तिरूपे ।। समर्थ रामदासांनी रामभक्तीप्रमाणे शक्तिदेवतेचेही पूजन केले. त्यांचा कार्य तीन प्रकारचे आहे. एक व्यक्तीचा विकास, दुसरे राष्ट्राचा उद्धार, तिसरे जगाचे कल्याण. त्यांना आत्मचिंता, राष्ट्रचिंता, विश्वचिंता व धर्मचिंता होती. देश परिस्थिती जाणून तिच्या उद्धारार्थ त्यांनी उदंड उपाय केले, सुचविले. हजारो शिष्य तयार केले. अनेक मंडळे, मठ स्थापिले. कडक शिस्त व नियम राखले. सर्वांचे नेतृत्व व चालकत्व केले. आपली उच्च पारमार्थिक बेठक ढळू न देता महाराष्ट्रातील व्यवहाराला कर्मयोगपर वळण दिले. त्यांच्या विवेचनात उत्तम कार्यप्रणवता, सुबकता आहे.

याच सुमारास ज्या ‘ आनंदवन भुवना’चे स्वप्न समर्थांनी पाहिले, ते प्रत्यक्षात आणणाऱ्या शिवाजी महाराजांचा उदय झाला. एकनाथ, तुकाराम, रामदास या संत महंतांनी जीव ओतून जी महाराष्ट्र धर्माची भूमी नांगरून ठेवली होती, त्यात शिवरायरूपी सकस, सुयोग्य असे बीज अंकुरले, फोफावले! शिवराय गेल्यावर समर्थ रामदासांनीही आपले कार्य आटोपते घेतले. दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. ‘अखंड सावधान असावे’ हे संभाजीराजांना पत्र लिहिले. राममूर्तीचे दर्शन घेऊन, पलंगावरून खाली उतरून उत्तराभिमुख बसले. गहिवरलेल्या शिष्यांना सांगितले, आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतः सिद्ध । असता न करावा हो खेद । भक्त जनी ।। आणि रामनाम गजर करीत या ज्ञानयोगी, कर्मयोगी महात्म्याने आपली अवतार समाप्ती केली.

Comments
Add Comment