Thursday, June 11, 2026

Laadki Bhahin Yojna : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार

Laadki Bhahin Yojna : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील लाखो महिलांना अखेर दिलासा मिळाला आहे. या योजनेच्या निधी वितरणासाठी राज्य सरकारने ३४४ कोटी मंजूर केले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या स्तरावर आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मंजुऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, हा हप्ता लवकरच थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना बंद होणार किंवा हप्ते थांबणार, अशा प्रकारच्या विविध अफवा आणि गैरसमज पसरवले जात होते. मात्र, या सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आश्वस्त केले आहे की, विरोधकांकडून या योजनेसंदर्भात विनाकारण संभ्रम निर्माण केला जात असून, योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ज्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात सुरळीतपणे जमा करण्यात आला होता, अगदी त्याच धर्तीवर मे महिन्याचा हप्ताही कोणत्याही तांत्रिक अडथळ्याविना लवकरच राज्यातील पात्र भगिनींच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांनाच याचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून सातत्याने बारकाईने पडताळणी (स्क्रूटिनी) केली जात आहे. गेल्या काही महिन्यांतील तपासणी दरम्यान काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियम डावलून या योजनेचा लाभ उठवल्याचे समोर आले होते. यामध्ये प्रामुख्याने वर्ग तीन आणि वर्ग चारच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. हा गैरप्रकार उघडकीस येताच शासनाने कठोर पावले उचलत अशा अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे हप्ते जानेवारी महिन्यापासूनच पूर्णपणे बंद केले आहेत, तसेच उर्वरित संशयास्पद खात्यांचीही डेटा स्क्रूटिनीच्या माध्यमातून कसून चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >