Tuesday, June 9, 2026

Nashik Cyber Crime : एका कोडने WhatsApp हॅक ! ‘कॉल फॉरवर्डिंग’चा नवा सापळा उघड; सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला गंडा

Nashik Cyber Crime : एका कोडने WhatsApp हॅक ! ‘कॉल फॉरवर्डिंग’चा नवा सापळा उघड; सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याला गंडा

Nashik Cyber Crime : देशाच्या सीमेवर वर्षानुवर्षे सेवा बजावून परतलेल्या एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यालाच सायबर भामट्यांनी (Cyber Crime) आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरात समोर आली आहे. ‘पार्सल डिलिव्हरी’च्या (Parcel Delivery) बहाण्याने फक्त एक कोड डायल करायला लावून WhatsApp हॅक करण्याचा अत्यंत धोकादायक आणि नवा सायबर ट्रॅप (Cyber ​​Trap) या घटनेतून उघडकीस आला आहे. या फसवणुकीत तब्बल ७८ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

देवळाली कॅम्पमधील हिलवूड सोसायटीत राहणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कमलेश विश्वविनायकसिंग चौहान (वय ६१) यांनी याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

एका कोडने WhatsApp हॅक

मिळालेल्या माहितीनुसार, चौहान यांना स्वतःला ‘ब्लू डार्ट कुरिअर’ कंपनीचा प्रतिनिधी सांगणाऱ्या व्यक्तीने फोन केला. “तुमचा पत्ता सापडत नाही, एक कोड डायल करा म्हणजे लोकेशन मिळेल,” असे सांगून संबंधिताने त्यांना मोबाईलवर एक कोड डायल करण्यास सांगितले. कोणताही संशय न आल्याने चौहान यांनी तो कोड डायल केला आणि इथूनच सायबर जाळ्याची सुरुवात झाली.

अन थेट कॉल फॉरवर्डिंग’ सक्रिय

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा कोड प्रत्यक्षात ‘कॉल फॉरवर्डिंग’ सक्रिय करणारा होता. कोड डायल होताच चौहान यांच्या मोबाईलवर येणारे कॉल आणि एसएमएस थेट सायबर चोरट्याच्या क्रमांकावर वळवले गेले. याचाच फायदा घेत भामट्याने चौहान यांचे WhatsApp आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले. व्हेरिफिकेशनसाठी येणारा OTP थेट भामट्यालाच मिळाल्याने WhatsAppचा ताबा काही क्षणांतच गेला.

मित्रमंडळींना आणि लष्करी अधिकाऱ्यांना मेसेज

WhatsApp हॅक होताच भामट्याने चौहान यांच्या प्रोफाईलवरून त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना आणि लष्करी अधिकाऱ्यांना तातडीने पैशांची गरज असल्याचे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. मेसेज स्वतः चौहान यांनीच पाठवला असल्याचा विश्वास बसल्याने काही मित्रांनी कोणतीही खात्री न करता पैसे ट्रान्सफर केले. देवळालीतील डॅनियल मेन्सी यांनी २३ हजार रुपये, तर लेह (लडाख) येथे कार्यरत कर्नल क्षितिज चौहान यांनी ३५ हजार रुपये संबंधित यूपीआय आयडीवर पाठवले. इतर व्यवहारांसह एकूण ७८ हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

​सायबर पोलिसांचा इशारा

या घटनेनंतर नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. मोबाईलवर अनोळखी व्यक्ती सांगेल तो 401 किंवा तत्सम कोड कधीही डायल करू नका. हा ‘कॉल फॉरवर्डिंग’चा सापळा असू शकतो. तसेच WhatsAppवर मित्र किंवा नातेवाईक अचानक पैशांची मागणी करत असल्यास आधी त्यांना थेट फोन करून खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, लष्करी अधिकाऱ्यांनाही गंडा घालणारी ही टोळी नेमकी कोण, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता नाशिक सायबर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Comments
Add Comment