Monday, August 10, 2026

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आफ्रिकन देशांमध्ये मनोव्याधीवरील सूचीबध्‍द औषधे- पदार्थ असलेल्या ‘ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड’ गोळ्यांचे गुप्तपणे उत्पादन, लपवाछपवी आणि अवैध निर्यात करणारे एक संघटित नेटवर्क उद्ध्‍वस्त केले .

गुप्त माहितीवर आधारित या कारवाईत एक लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्या, एक लाख टॅपेंटाडोल गोळ्या तसेच मनोव्याधीवर उपयुक्त ठरणारी औषधे, त्यासाठी लागणारे पदार्थ तसेच गुप्त उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कच्चा माल जप्त करण्यात आला असून या टोळीच्या तीन प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आठवडाभर सुरू होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथे नायजेरियाला जाणारा निर्यात माल अडवला. या निर्यात मालामध्ये प्रेगाबालिन कॅप्सूल - 300 MG असल्याचे घोषित करण्यात आले होते. सखोल तपासणीअंती या निर्यात मालामध्ये लपवून ठेवलेल्या एक लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड 250 मिलीग्रॅमच्या गोळ्या (वजन अंदाजे 25 किलो) आणि एक लाख टॅपेंटाडोल 200 मिग्रॅच्या गोळ्या (वजन अंदाजे 20 किलो) जप्त करण्यात आल्या.

डीआरआयने केलेल्या वेगवान तपासामुळे अनेक टप्प्यांवर चालणारी एक सुसंघटित पुरवठा साखळी उघडकीस आली. ट्रॅमाडोलच्या गोळ्या महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील एका कारखान्यात गुप्तपणे तयार केल्या जात होत्या आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी साध्या पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये पॅक केल्या जात होत्या. त्यानंतर हा माल मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्सजवळील एका गोदामात नेण्यात येत होता. या ठिकाणी तो पांढऱ्या गोण्यांमध्ये पुन्हा पॅक करून नायजेरियाला अवैध निर्यात करण्‍यासाठी सज्ज केला जात होता.

या प्रकरणात डीआरआय अधिकाऱ्यांनी निर्यातदार, उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि साठवणुकीच्या गोदामाशी संबंधित अशा अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. उत्पादन सुविधेवरील शोधमोहिमेत मादक पदार्थांच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅब्लेट कॉम्प्रेशन मशिनरीसह मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त करण्यात आला. या कारवाईच्या अखेरीस आयईसी धारक/निर्यातदार, पुरवठादार-सह-समन्वयक आणि ट्रॅमाडोल गोळ्यांचा गुप्त उत्पादक यांचा समावेश असलेल्या तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली.

ट्रॅमाडोल आणि टॅपेंटाडोल ही कृत्रिम अफीमयुक्त वेदनाशामक औषधे आहेत, जी मध्यम ते तीव्र वेदनाशामक आहेत. डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन दाखवल्याशिवाय ही औषधे कोणत्याही मेडिकलमधून खरेदी करता येत नाहीत. तसेच या औषधाची निर्मिती करताना सरकारकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात या औषधांची बेकायदेशीररित्या निर्मिती आणि व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे डीआरआयने कारवाई केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >