Tuesday, June 9, 2026

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा ! वडापावच्या किमतीत आक्षेपार्ह व्हिडिओची विक्री , अवघ्या...

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा ! वडापावच्या किमतीत आक्षेपार्ह व्हिडिओची विक्री , अवघ्या...

Ashok Kharat : नाशिकमधील ( Nashik ) .भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची अंधश्रद्धेच्या नावाखाली कथित फसवणूक करणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू आहे. आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल ७४ टेलिग्राम ग्रुप्स आणि सोशल मीडिया खात्यांचा शोध लावला आहे. एवढंच नाही तर काही कथित व्हिडीओ अवघ्या २० रुपयांना विकले जात असल्याची धक्कादायक माहितीही तपासातून समोर आली आहे.

७४ टेलिग्राम ग्रुप्स आणि सोशल मीडिया खाती रडारवर

नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. मात्र, तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासेही समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ७४ टेलिग्राम ग्रुप्स आणि विविध सोशल मीडिया खात्यांची ओळख पटवली आहे. यामध्ये कथित व्हिडीओ, फोटो आणि पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४०६ आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो हटवण्याची कारवाई केली आहे. या प्रकारामुळे केवळ गोपनीयतेचा भंगच होत नाही, तर महिलांच्या सन्मानालाही धक्का पोहोचत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Ashok Kharat)

अवघ्या २० रुपयांना व्हिडीओंची विक्री ?

या तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अशोक खरातच्या केबिनमधील कथित अश्लील व्हिडीओ काही समाजकंटकांकडून टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया ग्रुप्सवर अवघ्या २० रुपयांना विकले जात होते. काही जण या व्हिडीओंचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे या प्रकरणाला केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यावसायिक गैरवापराचाही गंभीर पैलू जोडला गेला आहे.

परदेशापर्यंत पोहोचले कथित व्हिडीओ

सायबर पोलिसांच्या (Cyber ​​police) तांत्रिक तपासातून या प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडीओंचा प्रसार संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील तब्बल २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही हे व्हिडीओ शेअर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा तपास आता अधिक व्यापक स्तरावर होण्याची शक्यता आहे.

मुख्य संशयिताचा शोध, मध्यस्थांना नोटिसा

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी ११ सोशल मीडिया मध्यस्थांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी २५ खात्यांकडून प्रतिसादही प्राप्त झाला आहे. याशिवाय या गैरप्रकारात सहभागी असलेल्या एका मुख्य संशयित आरोपीची ओळख पटल्याचे सांगितले जात असून, त्याची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे.

नागरिकांना पोलिसांचे स्पष्ट आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे कोणतेही आक्षेपार्ह किंवा अश्लील व्हिडीओ डाउनलोड करणे, खरेदी करणे किंवा फॉरवर्ड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणालाही अशा प्रकारचे टेलिग्राम ग्रुप्स, लिंक किंवा सोशल मीडिया अकाउंट्स आढळल्यास त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू झालेलं हे प्रकरण आता सोशल मीडिया गैरवापर, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरणाऱ्या कथित व्हिडीओंपर्यंत पोहोचलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी किती मोठे खुलासे होतात? आणि यामागे नेमकं कोणतं रॅकेट काम करतंय? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >