Tuesday, June 9, 2026

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा स्कॉच पुरस्कार

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा स्कॉच पुरस्कार

शासन आपल्या दारी'च्या यशाबद्दल 'स्कॉच ग्रुप' कडून झाला सन्मान

२०२४ साली जाहीर झालेला पुरस्कार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द

मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाला २०२४ साली मानाचा स्कॉच पुरस्कार (SKOCH Award) जाहीर झाला होता. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा पुरस्कार त्यांना दिल्लीला जाऊन स्वीकारता येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे आज स्कॉच ग्रुप'च्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी येऊन त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी 'स्कॉच ग्रुप' चे अध्यक्ष समीर कोचर, उपाध्यक्ष डॉ गुरुशरण धंजल, व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल हेही उपस्थित होते.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात राबविण्यात आला होता. त्यावेळी देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” च्या या महाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली होती. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम वर्षभर यशस्वीरीत्या चालवून विविध शासकीय योजनांचे लाभ पाच कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहचवले होते.

तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठीचा पुरस्कार ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे यांनी स्वीकारला होता. मात्र हा पुरस्कार राज्याचे प्रमुख म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणे बाकी असल्याने आज हा पुरस्कार त्यांना आणून प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'स्कॉच ग्रुप'चे आयोजक आणि परीक्षकांचे विशेष आभार मानले. नागरिकांना शासनाचे विविध लाभ कुठल्याही अडथळ्याविना, सुलभरीत्या त्यांच्यापर्यंत मिळावेत म्हणून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम यापुढेही असाच सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे शिंदे यांनी स्पष्ट केले. विविध शासकीय योजनांचे लाभ कोणत्याही अडथळ्याविना सर्वसामान्य नागरिकांना मिळावेत, त्यासाठी त्याना वारंवार सरकारी कार्यालयात चक्कर मारावी लागू नये, त्यासाठी नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम त्यावेळी सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला मानाचा स्कॉच पुरस्कार मिळणे ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब असून याद्वारे सार्वजनिक सेवांच्या यशस्वी वितरणाचे एक आदर्श उदाहरण देशासमोर आले आहे याचा सार्थ आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे मत शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.

माझे सहकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या सर्वांच्या अथक प्रयत्नांच्या बळावरच 'शासन आपल्या दारी'ला मनाचा 'स्कॉच पुरस्कार' मिळाला असून हा पुरस्कार या सर्वांच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

या पुरस्काराने महायुती शासनाचा उत्साह अधिक वाढला असून, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफी योजना, नमो शेतकरी सन्मान योजना यासारख्या योजना अधिक परिणामकारकरित्या राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे लाभ पोहचावे यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील राहील असा निर्धार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा