Saturday, June 6, 2026

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकीत चौघांचा जागीच अंत झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये १ वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनं कुटुंबियांवर आभाळ कोसळलं आहे. (Jalgaon Accident )

नेमकी घटना काय घडली ?

मलकापूर येथील एकाच कुटुंबातील चार सदस्य मुंबई-नागपूर महामार्गावरील बायपासवरुन वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. गावाच्या काहीसे पुढे जात असतानाच समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. (Jalgaon Accident News )

रुग्णालयात नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत दुचाकीची ओळख पटवली आणि त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ सर्व जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केलं, तर चौथ्या व्यक्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे :

विजय शंकर काळे (वय 19 वर्षे)

ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30 वर्षे)

विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14 वर्षे)

मोनालिसा शिवबसप्पा भोसले वय (1 वर्ष)

आपल्या अत्यंत जवळच्या चार आप्तस्वकीयांच्या मृत्यूची बातमी समजताच जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.

जळगाव पोलिसांची शासकीय रुग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी ( Jalgaon Police ) तातडीने शासकीय रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी मृतकांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांची समजूत काढण्याचा आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर संबंधित स्कॉर्पिओ वाहनचालकाविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, अशी आग्रही मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेला स्कॉर्पिओ चालकही या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >