Saturday, May 30, 2026

बलाढ्य बंगळूरु विरुद्ध जिद्दी गुजरात

बलाढ्य बंगळूरु विरुद्ध जिद्दी गुजरात

अहमदाबादमध्ये आज आयपीएलचा महासंग्राम मुंबई : क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय लीग म्हणजेच 'इंडियन प्रीमियर लीग २०२६' ता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटचा महासंग्राम आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि २०२२ चा चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात यंदाच्या ट्रॉफीसाठी थरारक संघर्ष पाहायला मिळेल. एका बाजूला बंगळूरुची आक्रमक फलंदाजी, तर दुसऱ्या बाजूला गुजरातची जिद्दी रणनीती; यामुळे हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.बंगळूरुचा संघ यंदाच्या हंगामात अत्यंत निर्भय आणि आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला गेला आहे. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टिम डेव्हिड, फिल सॉल्ट आणि वेंकटेश अय्यर यांसारख्या स्फोटक फलंदाजांच्या जोरावर आरसीबीने यंदा अनेकदा २०० धावांचा टप्पा सहज पार केला आहे. खेळपट्टी कशीही असो, पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवणे हीच आरसीबीची मुख्य ताकद आहे. दुसरीकडे, कर्णधार रजत पाटीदार याने संघाला कमालीचे स्थैर्य दिले आहे. विराट कोहलीप्रमाणे आक्रमक नेतृत्वशैली नसली, तरी पाटीदारच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे युवा खेळाडूंना मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.दरम्यान घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला कमी लेखण्याची चूक आरसीबी करणार नाही. गुजरातचा प्रेरणादायी कर्णधार शुभमन गिल सध्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकहाती झंझावाती शतक झळकावून त्याने संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले. त्यातच अहमदाबादचे मैदान हे गिलचे आवडते मैदान मानले जाते. दबावाच्या क्षणी इतिहास रचण्याचा गिलचा आयपीएल प्लेऑफमधील रेकॉर्ड पाहता, गुजरात संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा 'फायनल' कामगिरीची अपेक्षा असेल.आरसीबी आपले जेतेपद राखण्यात यशस्वी ठरणार की शुभमन गिलचा गुजरात संघ घरच्या मैदानावर आरसीबीचे स्वप्न भंग करणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. एक लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत आज रात्री आयपीएल २०२६ चा नवा राजा मिळणार आहे.

गुजरातची मदार अव्वल फळीवर दुसरीकडे गुजरात टायटन्सची सर्वाधिक ताकद म्हणजे त्यांची अव्वल फलंदाजी. कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या त्रिकुटाने संपूर्ण स्पर्धेत संघाचा डाव सांभाळला आहे. गिलने ७२२ धावा, सुदर्शनने ७१० धावा तर बटलरने ५०७ धावा करत गुजरातला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गुजरातचा मधला फळा तुलनेने कमकुवत मानला जात असल्याने अंतिम सामन्यातही संघाची मोठी जबाबदारी या तिघांवर असणार आहे. अहमदाबादमधील सात सामन्यांपैकी पाच विजय मिळवल्यामुळे घरच्या मैदानावरील यश गुजरातसाठी आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकते. गोलंदाजांमधील संघर्ष ठरणार निर्णायक बंगळूरुच्या विजयामागे त्यांच्या गोलंदाजांचाही मोठा वाटा आहे. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रासिख सलाम आणि कृणाल पंड्या यांनी प्रतिस्पर्धी संघांना सुरुवातीच्या षटकांतच रोखून धरले आहे. विशेषतः भुवनेश्वर कुमारने २६ बळी घेत जांभळ्या टोपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर असलेल्या गोलंदाजांना कडवी टक्कर दिली आहे. मात्र गुजरातकडेही कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशिद खान, जेसन होल्डर आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारखी तगडी गोलंदाजी फळी आहे. २८ बळींसह रबाडा सध्या सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. सिराज आणि रबाडा यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव निर्माण करत मोठ्या प्रमाणात निर्धाव चेंडू टाकले आहेत. सिराजच्या तंदुरुस्तीवर लक्ष राजस्थानविरुद्धच्या पात्रता फेरीतील सामन्यात मोहम्मद सिराजला खांद्याची किरकोळ दुखापत झाली होती. त्याने पूर्ण चार षटके टाकली असली तरी त्याला काहीसा त्रास जाणवत होता. अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीवर गुजरात व्यवस्थापनाचे विशेष लक्ष असेल. बंगळूरुचे पारडे जड

दोन्ही संघांमधील एकूण नऊ सामन्यांपैकी बंगळूरुने पाच सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामात झालेल्या तीन लढतींपैकी दोन सामन्यांत बंगळुरूने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पात्रता फेरीत बंगळूरुने गुजरातचा तब्बल ९२ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात बंगळूरु आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे.

फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी

नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांकडून धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २०० पेक्षा अधिक धावांचा डाव उभारला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रात्री दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

ई साला नू कप नम्दे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला सलग दुसरे आयपीएल विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. जर बंगळुरूने हा सामना जिंकला तर ते सलग दोन हंगामांत विजेतेपद मिळवणाऱ्या संघांच्या यादीत स्थान मिळवतील. मात्र गुजरात टायटन्ससारख्या संतुलित आणि लढाऊ संघाला कमी लेखणे धोकादायक ठरू शकते.

हेड-टू-हेड टी-२० रेकॉर्ड (सामने आणि आकडेवारी)

एकूण खेळलेले सामने: ०९ आरसीबीने जिंकलेले सामने: ०५ जीटीने जिंकलेले सामने: ०४ टाय/अनिर्णित : ०० पहिला वहिला सामना: ३० एप्रिल २०२२ (जीटी विजयी) सर्वात अलीकडील सामना: २६ मे २०२६ (आरसीबी विजयी)

सामना कोणाच्या बाजूने?

कागदावर पाहता आरसीबी अधिक संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण संघ वाटतो. त्यांच्याकडे फलंदाजीची खोली, अनुभवी गोलंदाज आणि अंतिम सामन्याचा अनुभव आहे. गुजरातकडे उत्कृष्ट गोलंदाजी आणि दमदार सलामी जोडी असली तरी मधल्या फळीतील कमकुवतपणा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. आरसीबीचा विजयाचा दावा अधिक मजबूत दिसत असला, तरी शुभमन गिल, साई सुदर्शन आणि राशिद खान यांचा एक उत्कृष्ट दिवस गुजरातला दुसरे विजेतेपद मिळवून देऊ शकतो. त्यामुळे हा अंतिम सामना रोमांचक आणि चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य निकाल : आरसीबी ५५%, गुजरात ४५%.

दोन्ही संभाव्य संघ गुजरात टायटन्स सुदर्शन (सलामीवीर) शुभमन गिल (कर्णधार / सलामीवीर) जॉस बटलर (यष्टिरक्षक ) वाशिंग्टन सुंदर (ऑलराउंडर) निशांत सिंधू (ऑलराउंडर) जेसन होल्डर (ऑलराउंडर) रशीद खान (फिरकीपटू ) कागिसो रबाडा (वेगवान गोलंदाज) आर. साई किशोर (फिरकीपटू) मोहम्मद सिराज (वेगवान गोलंदाज) प्रसिद्ध कृष्णा (वेगवान गोलंदाज) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु व्यंकटेश अय्यर (सलामीवीर) विराट कोहली (सलामीवीर/फलंदाज) देवदत्त पडिक्कल (फलंदाज) रजत पाटीदार (कर्णधार) जितेश शर्मा (यष्टिरक्षक) टिम डेव्हिड (फिनिशर) कृणाल पंड्या (ऑलराउंडर) भुवनेश्वर कुमार (वेगवान गोलंदाज) जेकब डफी (वेगवान गोलंदाज ) जोश हेझलवूड (वेगवान गोलंदाज) रसिख सलाम दार (वेगवान गोलंदाज) टॉसची भूमिका संध्याकाळी दव पडण्याची शक्यता असल्याने, टॉस जिंकणारा कर्णधार आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा