Friday, May 29, 2026

Shivsena Eknath Shinde : माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह २५ हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

Shivsena Eknath Shinde : माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यासह २५ हजार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

शिंदेंच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब

४३ अंश तापमानातही हजारोंची उपस्थिती

विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे मराठवाड्यात भव्य शक्तिप्रदर्शन

लातूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये काल (गुरुवार, २८ मे) शिवसेनेचा अभूतपूर्व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल २५ हजार कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शक्तिप्रदर्शन केले. कडाक्याच्या ४३ अंश तापमानातही हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत मैदानावर जनसागर उसळला होता. “हा पक्षप्रवेश आतापर्यंतचा सर्वात मोठा सोहळा आहे,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

“विरोधकांच्या डोळ्यात कचरा गेला असेल तर त्यांनी येथे येऊन शिवसेनेचा हा महासोहळा पाहावा,” असा टोला लगावत शिंदे (Shinde) म्हणाले की, लोकांनी आपल्या कामाची पर्वा न करता प्रेमापोटी येथे गर्दी केली आहे. “मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात मी जिथे जातो तिथे जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत. आजचा दिवस हा आनंदाची दिवाळी आहे,” असेही त्यांनी म्हटले.

यावेळी विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश संपन्न झाला. “विनायकरावांच्या नावातच विनायक आहे. त्यांनी आज नव्या राजकीय आणि सामाजिक पर्वाचा श्रीगणेशा केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ हजार लोक शिवसेनेत प्रवेश करतात, हा इतिहास आहे,” असे सांगत शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

शिवसेनेत सातत्याने मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचा उल्लेख करताना त्यांनी बच्चू कडू, माजी खासदार आनंद परांजपे, शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. “शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या राजकारणात शिवसेना आता क्रमांक दोनचा पक्ष बनली आहे,” असा दावा त्यांनी केला.

राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “२०२२ मध्ये ४० आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून इतिहास घडवला. आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. राजकारणात शब्दाला फार महत्त्व असतं आणि एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे.”

सर्वसामान्य, शेतकरी आणि महिलांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, शेतकरी कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, एमआयडीसी (MIDC) आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. “३० जूनपर्यंत दोन लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी मुलींसाठी उच्च शिक्षण (Higher Education) मोफत, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि नावापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय यांची माहिती दिली. “मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे आणि आजही मी ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन ’ (Dedicated to Common Man) आहे,” असे शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांविषयीची बांधिलकी व्यक्त करताना त्यांनी अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याचे सांगितले. “त्या काळात आम्ही दिवाळी साजरी केली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला,” असे ते म्हणाले.

अल निनोमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंचनासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे सांगताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “त्यांच्या काळात सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता मिळाली नाही. आमचे सरकार आल्यानंतर शेकडो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली,” असे ते म्हणाले.

जलसंधारण, टँकरमुक्त गाव आणि जलव्यवस्थापनासाठी श्री श्री रविशंकर यांच्या संस्थेसोबत सामंजस्य करार केल्याची माहितीही त्यांनी दिली. “जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करून दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संघटन मजबूत करण्यावर भर देताना शिंदे यांनी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान राबवण्याचे आवाहन केले. मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देताना त्यांनी बीएलए-१, बीएलए-२ आणि बीएलओ यंत्रणा सक्षम करण्यास सांगितले. “मतदार यादी ही विजयाची गुरुकिल्ली असते,” असे ते म्हणाले.

शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “संपत्ती आणि प्रॉपर्टीपेक्षा माणसं कमावणं आणि त्यांचं प्रेम मिळवणं महत्त्वाचं आहे. व्यासपीठावर बसलेले नेते हे आमचं वैभव आहे, तर समोर बसलेली जनता हे आमचं ऐश्वर्य आहे.” सभेच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन वाढवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. “शिवसेनेत जो काम करेल तो पुढे जाईल,” असा संदेश देत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या विचारांची आठवण करून दिली.

या सभेला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार हेमंत पाटील, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, शेतकरी, युवक आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >