Saturday, May 23, 2026

कांदा बियाणे घेताना जरा जपूनच ! बाजारात बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री

कांदा बियाणे घेताना जरा जपूनच ! बाजारात बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री

अहिल्यानगर : शेतकऱ्यांवर आधीच अनेक संकट असताना शेतकरी राजा पुन्हा एकदा सापडला आहे. कारण बाजारात अनेक ठिकाणी बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री होत आहे. रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ करून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दोन जणांविरूध्द फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा निकृष्ट व परवानाविना विक्री होणार्‍या बियाण्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत बीज निरीक्षक तथा कृषी अधिकारी बाळासाहेब रामचंद्र कांबळे यांनी बुधवारी फिर्याद दिली. त्यानुसार पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) येथील मे. यमुनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक सुरज शिवानंद शिंदे आणि शिंगवे नाईक (ता. अहिल्यानगर) येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचा मालक निखील गोविंद पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी शिंगवे नाईक (Shingave Naik) येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित विक्रेत्याकडे आवश्यक परवाना नसताना बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ आढळून आली. या भेसळीमुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. संबंधित संशयित आरोपींनी बियाणे शेतकर्‍यांना विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.

शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यास कायदेशीर कारवाई

दरम्यान, बियाणे विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अनधिकृत आणि बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. ज्या कृषी सेवा केंद्र चालकांकडे वैध परवाना नाही किंवा जे चालक परवान्यात नसलेल्या कृषी निविष्ठाची विक्री करतील, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. शेतकर्यांना देण्यात येणार्या प्रत्येक बिलावर बियाण्याचा प्रकार, जात आणि लॉट नंबर अचूक असणे बंधनकारक आहे. बिलांमध्ये फेरफार करून किंवा चुकीची जात लिहून शेतकर्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास परवाना रद्द करण्यासोबतच प्रशासकीय व कायदेशीर कारवाईला (legal action) करणार असल्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा